साखर कारखाना संचालकांचं गाव म्हणून बहेची नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:06 IST2015-08-26T23:06:41+5:302015-08-26T23:06:41+5:30

परिसरात चर्चा : दोन साखर कारखान्यात चौघांना संधी

A new identity of the village of sugar factory directors | साखर कारखाना संचालकांचं गाव म्हणून बहेची नवी ओळख

साखर कारखाना संचालकांचं गाव म्हणून बहेची नवी ओळख

निवास पवार- शिरटे  साखर कारखानदारीत महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त केलेल्या साखराळेच्या राजारामबापू व रेठरे बुद्रुकच्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्यात बहे (ता. वाळवा) येथील प्रत्येकी दोन असे चार संचालक एकाचवेळी कार्यरत आहेत. त्यामुळे रामलिंग बेटासाठी प्रसिध्द असलेल्या बहेची ‘साखर संचालकांचे गाव’ म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे.
तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्याच्या इतिहासात नोंद करावी, अशी कामगिरी श्री क्षेत्र रामलिंग बेटासाठी प्रसिध्द असणाऱ्या बहे गावाने केली आहे. वाळवा व कऱ्हाड तालुक्यातील या दोन्ही साखर कारखान्यांच्या मध्यवर्ती असणाऱ्या गावात यापूर्वी राजारामबापू कारखान्याकडे एक व कृष्णा कारखान्याकडे दोन असे तीन संचालक होते. मात्र यावेळी दोन्ही कारखान्यांनी दोन-दोन संचालकांना संधी दिल्याने त्यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या कृष्णा कारखान्याच्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी सहकार पॅनेलच्या माध्यमातून राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांच्या पत्नी सौ. जयश्री पाटील, तसेच ‘कृष्णा’चे माजी संचालक अमोल गुरव यांना निवडणुकीत उतरवले. अमोल गुरव यांनी ‘कृष्णा’च्या पटलावर दुसऱ्यांदा बाजी मारत ‘सहकार’च्या संचालक निवडीचा श्रीगणेशा केला. जयश्री पाटील याही भरघोस मतांनी निवडून आल्याने गतवर्षीची पुनरावृत्ती यावेळीही घडून आली.
राजारामबापू कारखाना निवडणुकीवेळी विठ्ठलराव पाटील यांनी संचालक पदावर दावा केला होता. परंतु बेरजेच्या राजकारणात जयंत पाटील यांनी विठ्ठल पाटील यांना थांबवण्याचा सल्ला दिला होता. यावेळी सौ. सुवर्णाताई कृष्णराव पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी दिलेला शब्द पाळत, विठ्ठल पाटील यांना तज्ज्ञ संचालकपदी काम करण्याची संधी दिली.
बहे, हुबालवाडी, खरातवाडी या तिन्ही गावांचे बहुतांशी आर्थिक व्यवहार बहे विकास सोसायटीतून केले जातात. एकाच गावात चार संचालक असल्याने याचा फायदा ऊस उत्पादकांना होतो. एकाच गावातील चौघांना साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने, ग्रामस्थांसह त्यांच्या समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे.
चारही संचालक आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. प्रत्येक निवडणुकीत बदलणारे गटातटाचे राजकारण या गावाला नवीन नाही. परंतु यावेळी दोन्ही कारखान्यांची सत्ता प्रबळ गटाकडे आल्याने, पुढील राजकारणावर याचा काय परिणाम होईल, हे येणारा काळच ठरविणार आहे.

Web Title: A new identity of the village of sugar factory directors