द्राक्षबागायदार शेतकऱ्यांवर नवे संकट; अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 13:34 IST2022-01-03T13:33:26+5:302022-01-03T13:34:31+5:30
मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. द्राक्षघडाच्या बचावासाठी बागांना जाळ्या मारण्यात येत आहेत.

द्राक्षबागायदार शेतकऱ्यांवर नवे संकट; अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले
सांगली : अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले सुरु झाले आहेत. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. द्राक्षघडाच्या बचावासाठी बागांना जाळ्या मारण्यात येत आहेत.
सध्या द्राक्षमण्यांत साखर भरु लागली आहे. घड पक्व झाले आहेत. ही टपोरी द्राक्षे वटवाघळांच्या हल्ल्याचे बळी ठरु लागली आहेत. रात्री दहा-अकरानंतर वटवाघळांचे थवे बागेत घुसतात, रात्रभर धुमाकूळ घालतात. खाणे कमी, पण नासधुसच प्रचंड प्रमाणात करतात. सकाळी शेतकरी बागेत जातो, तेव्हा बागेत सर्वत्र विखरुन पडलेले द्राक्षघड दिसतात. एका रात्रीत दोन-तीन एकर बागेचा सुपडासाफ होतो.
वटवाघळांपासून बचावासाठी बागांभोवती जाळी लपेटावी लागत आहे. यापूर्वी पक्ष्यांसाठी हलकी जाळी लावली जायची, पण वटवाघळांसाठी जाडसर जाळी लावावी लागत आहे. काही शेतकरी बागेत रात्रभर प्रखर दिवे लावून ठेवत आहेत. तीव्र प्रकाशापासून वटवाघळे दूर राहतात, बागेचा बचाव होतो. काही बागांत मोठ्या आवाजात गाणी लावण्याचा प्रयोगही शेतकऱ्यांनी केला आहे.
महामार्गासाठी वृक्षतोडीने वटवाघळे झाली सैरभैर
रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी ४७ हजारहून अधिक झाडे तोडण्यात आली. शंभर-दोनशे वर्षे जुन्या वडाच्या झाडांच्या गर्दीचा मिरज-पंढरपूर मार्ग वृक्षतोडीने उजाड झाला. हजारो वटवाघळांची आश्रयस्थाने नष्ट झाली. सैरभैर झालेली वटवाघळे महामार्गानजिकच्या गावांत शेतांतील झाडांवर मुक्कामाला येत आहेत. रात्री द्राक्षबागांमध्ये घुसत आहेत. महामार्गाच्या कामाचा हा विपरीत परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
दलालांनी बागांचे करार केले आहेत. आम्ही आगाऊ रकमादेखील घेतल्या आहेत. दलालाकडून द्राक्षाची छाटणी होईपर्यंत बाग जीवापाड सांभाळावी लागत आहे. वटवाघळांपासून बचावासाठी रात्रभर जागे रहावे लागत आहे.- रामगौंड पाटील, द्राक्ष शेतकरी, लक्ष्मीवाडी