सांगली जिल्ह्यात नव्या ६५ बसेस दाखल, मात्र भंगारात जाणार १०९
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:09 IST2025-07-09T19:09:12+5:302025-07-09T19:09:34+5:30
वर्षभराची यादी तयार : तुलनेने नव्या बसेसची संख्या कमी

सांगली जिल्ह्यात नव्या ६५ बसेस दाखल, मात्र भंगारात जाणार १०९
प्रसाद माळी
सांगली : जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये ६५ नव्या दमाच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. परंतु या वर्षभरात तब्बल १०९ बसेस भंगारात निघणार आहेत. जिल्ह्यातील आगारांसाठी २०० बसेसची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या बसेसपेक्षा कालबाह्य होणाऱ्या बसेसची सख्या अधिक आहे.
एसटीने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात ५० टक्क्यांची सवलत आदींमुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी आजही प्रवासी एसटीलाच प्राधान्य देतात. यामुळे एसटीच्या महसुलात सुद्धा वाढ होत आहे. पण, त्या तुलनेत बसेसची संख्या वाढत नाही. यासह जुन्या बसेस कालबाह्य होत आहेत. यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या बसेसवर ताण वाढत आहे.
अनेक मार्गांवर बसेस वाढविण्याची तसेच नव्या मार्गावर बसेस सुरू करण्याची मागणी आहे. पण, बसेस संख्या अपुरी असल्याने ती पूर्ण करणे आगारांना शक्य होत नाही. सांगली विभागातील विविध आगारातील १०९ बसेस या वर्षभरात भंगारात जाणार आहेत. तसेच सध्या नव्या ६५ लालपरी बसेस दाखल झाल्या असून अद्याप १३५ नव्या बसेसची मागणी प्रलंबित आहे.
महापालिकेची ई-बसेसेची प्रतीक्षा
महापालिका क्षेत्रात ४० सिटी बसेसची सेवा सुरू आहे. महापालिकेकडून ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. ती सेवा लवकरात लवकर सुरू झाल्यास महापालिका क्षेत्रातील सिटी बसेस अन्य मार्गावर वळविणे शक्य होणार आहे.
आगार निहाय दाखल झालेल्या नव्या बसेस (चार्ट)
- सांगली : १०
- मिरज : ५
- विटा : ५
- इस्लामपूर : १०
- तासगाव : ५
- जत : ५
- आटपाडी : ५
- कवठेमहांकाळ : ५
- शिराळा : १०
- पलूस : ५
- एकूण : ६०
आर्थिक वर्षात महिन्यानुसार कालबाह्य होणाऱ्या बसेस (चार्ट)
- एप्रिल : ३,
- मे : ३
- जून : ९
- जुलै : २७
- ऑगस्ट : ३०
- सप्टेंबर : १२
- ऑक्टोंबर : ७
- नोव्हेंबर : १३
- डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी (२०२६) : ०
- मार्च (२०२६) : ५
- एकूण : १०९
वर्षभरात १०९ बसेच कालबाह्य होणार असल्याने ताण वाढणार आहे. सांगली विभागासाठी नव्या २०० बसेसची मागणी केली आहे. त्यानुसार ६५ बसेस दाखल झाल्या आहेत. पुढील टप्प्यात आणखी काही बसेस दाखल होतील. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली