सोनहिरा खोऱ्यातील आठ पुलांची उंची वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:27 AM2021-07-29T04:27:43+5:302021-07-29T04:27:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्‍याच्या सोनहिरा खोऱ्यातील प्रमुख रस्त्यांवरील आठ पुलांवर दरवर्षी पुराचे पाणी येते आणि ...

Need to increase the height of eight bridges in Sonhira valley | सोनहिरा खोऱ्यातील आठ पुलांची उंची वाढविण्याची गरज

सोनहिरा खोऱ्यातील आठ पुलांची उंची वाढविण्याची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव तालुक्‍याच्या सोनहिरा खोऱ्यातील प्रमुख रस्त्यांवरील आठ पुलांवर दरवर्षी पुराचे पाणी येते आणि वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या पुलांची उंची वाढविण्याची गरज व्यक्त हाेत आहे.

सोनहिरा खोऱ्याची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. पश्‍चिमेकडून सोनहिरा ओढ्यासह अन्य ओढे, ओघळी, नाले पूर्वेकडे वाहतात. हे सर्व प्रवाह सोनहिरा ओढ्याला मिळतात आणि सोनहिरा खोऱ्यातून पूर्वेकडे असलेल्या येरळा नदीला रामापूर हद्दीत मिळतात. या खोऱ्यातील चिंचणी येथे १५७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरतो. संततधार मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाली की या तलावाचे ५ ते ६ स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो. यामुळे सोनहिरा खोऱ्यातील चिंचणी-वाजेगाव, चिंचणी-आसद, चिंचणी-मोहित्यांचे वडगाव, अंबक-मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे -अंबक, देवराष्ट्रे-शिरगाव सोनहिरा ओढ्यावरील या सहा पुलांसह चिंचणी-सोनकिरे रस्त्यावरील बेलगंगा ओढ्यावरील पूल आणि येरळा नदीवरील रामापूर-कामळापूर पूल अशा आठ पुलांवर पुराचे पाणी येते. यामुळे या पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे.

पश्‍चिम भागातून जाणाऱ्या प्रत्येक ओढ्यावर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. या खोऱ्यात ताकारी योजनेचे पाणी आल्यापासून हरितक्रांती झाली आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकवर्षी पाऊस जास्त पडतो. पाऊस व तलावातून होणाऱ्या विसर्गामुळे हे सर्व कमी उंचीचे पूल पाण्याखाली जातात. या पुलांवर पाणी असताना दुचाकीवरून जाण्याचे धाडस करणाऱ्या काही वाहनधारकांना येथे प्राण गमवावे लागले आहेत.

चौकट :

राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडून अपेक्षा

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वांगीण विकासाची कामे करून सोनहिरा खोरा सुजलाम सुफलाम केला. आता या कामातील काही राहिलेल्या उणिवा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दूर काराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

फोटो : २८ कडेगाव १

ओळ : कडेगाव तालुक्यात सोनहिरा खोऱ्यातील अत्यंत कमी उंचीच्या आसद-चिंचणी पुलावरून वाहत असलेले पुराचे पाणी.

Web Title: Need to increase the height of eight bridges in Sonhira valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.