नऊफुटी मगरीचे सांगलीत कृष्णा नदीपात्रालगत दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:03 IST2017-11-04T17:53:21+5:302017-11-04T18:03:00+5:30
सांगली येथील बायपास रस्त्यावरील पुलाखाली कृष्णा नदीपात्रालगत सुमारे नऊफुटी मगरीचे दर्शन झाले. नदीकाठापासून दहा फूट अंतरावर गवतात ही मगर निपचित पडल्याचे अनेकांनी पाहिले. शेतकऱ्यांनी पुलाखाली उतरुन मगरीला दगड मारुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दहा-पंधरा मिनिटे हा प्रकार सुरु होता. अखेर मगर पाण्यात गेली. पुलावरुन जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनी प्रथम मगरीला पाहिले.

नऊफुटी मगरीचे सांगलीत कृष्णा नदीपात्रालगत दर्शन
सांगली ,दि. ०४ : येथील बायपास रस्त्यावरील पुलाखाली कृष्णा नदीपात्रालगत सुमारे नऊफुटी मगरीचे दर्शन झाले. नदीकाठापासून दहा फूट अंतरावर गवतात ही मगर निपचित पडल्याचे अनेकांनी पाहिले. शेतकऱ्यांनी दगड मारुन या मगरीला नदीत हुसकावून लावले.
सांगलीत कृष्णा नदीत सातत्याने मगरीचे दर्शन होते. सकाळी पोहायला जाणाऱ्या लोकांना तर दररोज दर्शन होते. स्वामी समर्थ घाटापासून ते बायपास रस्त्यावरील पुलापर्यंत मोठमोठ्या मगरी पाण्यावर तरंगताना दिसतात. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता बायपास रस्त्याच्या पुलाखाली नऊफुटी मगर अनेकांनी पाहिली.
याठिकाणी फारशी वर्दळ नसते. त्यामुळे दुपारच्यावेळी ही मगर नदीतून थेट काठापासून दहा फूट अंतरावर गवतात निपचित पडली होती. पुलावरुन जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनी प्रथम मगरीला पाहिले.
मगर नदीतून बाहेर आल्याचे समजताच पुलावर गर्दी झाली. तोपर्यंत या भागातील शेतकरीही तिथे आले. त्यांनी पुलावरुनच मगरीला दगड मारले. काहीजणांनी पुलाखाली उतरुन मगरीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दहा-पंधरा मिनिटे हा प्रकार सुरु होता. अखेर मगर पाण्यात गेली.