राष्ट्रवादी, स्वाभिमानीची मते फुटली

By Admin | Updated: July 31, 2014 23:28 IST2014-07-31T22:57:37+5:302014-07-31T23:28:35+5:30

नियोजन समिती निवडणूक : काँग्रेसचे पाचही सदस्य विजयी

Nationalist, Swabhimani votes split | राष्ट्रवादी, स्वाभिमानीची मते फुटली

राष्ट्रवादी, स्वाभिमानीची मते फुटली

सांगली : जिल्हा नियोजन समितीतील महापालिकेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी बाजी मारली. विरोधी राष्ट्रवादी व स्वाभिमानीच्या मतांमध्ये फाटाफूट झाली. स्वाभिमानीने चार गटात काँग्रेसला, तर एका गटात राष्ट्रवादीला साथ दिली. राष्ट्रवादीची दोन ते तीन मते फुटल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीत महानगरपालिकेचे पाच सदस्य आहेत. या सदस्यांच्या निवडीसाठी २१ जणांनी अर्ज भरले होते. परंतु अर्ज माघार घेण्याच्यादिवशी १० जणांनी माघार घेतल्याने ११ उमेदवार रिंगणात राहिले. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी पाच, तर स्वाभिमानीच्या एका सदस्याचा अर्ज कायम राहिला. दरम्यान, महानगरपालिकेच्या ७८ नगरसेवकांनी काल मतदानाचा हक्क बजावला होतापालिकेत काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे २५, तर स्वाभिमानीचे ११ सदस्य आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार पवार यांच्या देखरेखीखाली आज गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.
खुल्या गटात काँग्रेसचे हारुण शिकलगार यांना ४४, राष्ट्रवादीचे महेंद्र सावंत २४, तर स्वाभिमानीचे जगन्नाथ ठोकळे यांना ८ मते मिळाली. या गटात दोन मते बाद झाली. काँग्रेसला दोन मते जादा मिळाली, तर राष्ट्रवादीचे एक, तर स्वाभिमानीची तीन मते फुटली.
महिला गटात काँग्रेसच्या बबिता मेंढे व राष्ट्रवादीच्या आशा शिंदे यांच्या चुरशीची लढत झाली. मेंढे यांना ४२, तर शिंदे यांना ३६ मते मिळाली. मागास प्रवर्गात काँग्रेसच्या किशोर लाटणे यांना ४८, राष्ट्रवादीचे राजू गवळींना २९ मते मिळाली. या गटात काँग्रेसला ६ मते जादा पडली. मागास प्रवर्ग महिला गटात काँग्रेसच्या मृणाल पाटील यांना ५०, तर राष्ट्रवादीच्या प्रियंका बंडगर यांना २८, तर अनुसूचित गटात काँग्रेसच्या अश्विनी कांबळे यांना ५५ व राष्ट्रवादीच्या स्नेहल सावंत यांना २३ मते मिळाली. या दोन्ही गटात स्वाभिमानीने काँग्रेसला साथ दिली. स्वाभिमानीला तीन मतांचा फटका बसला आहे. इतर गटात उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ दिली. (प्रतिनिधी)

पाच गटांपैकी चार गटांत काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतात वाढ झाली असली, तरी सर्वसाधारण महिला गटात मात्र काँग्रेसला संख्याबळाइतकीच मते मिळाली. काँग्रेसमधील एका गटाने राष्ट्रवादीला मदत केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती, तर स्वाभिमानीने काँग्रेसला साथ दिल्याचे समजते. कमी मताधिक्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती.

Web Title: Nationalist, Swabhimani votes split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.