सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित सांगली जिल्ह्यातील १९ गावांमधील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता नागपूर-रत्नागिरी महामार्ग अंकली (ता. मिरज) येथे अर्धा तास रोखला. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत सुरू केली. सरकारविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच महामार्ग रद्द होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला.आंदोलनामध्ये किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उद्धवसेनेचे शंभूराज काटकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटिल, धनाजी पाटील, विराज बुटाला, गिरीश पवार, प्रकाश पाटील, के. डी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्ग बाधित १९ गावांमधील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नागपूर-गोवा हा प्रस्तावित ८०२ किमीचा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये २७ हजार ५०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहेत. या महामार्गात पिकाऊ जमीन जाणार असल्याने याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे लोन उसळले आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली नाही तर राज्यभर शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार आहेत, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
आता आमदारांच्या दारात आंदोलन : उमेश देशमुखशक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी विद्यमान सरकारमध्ये सहभागी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला.झोपेचे सोंग घेतलेल्यांना शेतकऱ्यांचा विरोध कधी दिसणार? : सतीश साखळकरशक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. परंतु सरकारला शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. दिसणार नाहीच, कारण झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे. अशा सरकारला वठणीवर आणायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करावेच लागणार आहे, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला.