सांगलीत वृद्धावर खुनी हल्ला
By Admin | Updated: August 3, 2014 01:52 IST2014-08-03T01:20:11+5:302014-08-03T01:52:05+5:30
प्रकृती चिंताजनक : जखमी ‘किशोर लॉटरी’चे मालक; हल्लेखोरांचे पलायन

सांगलीत वृद्धावर खुनी हल्ला
सांगली : येथील राजवाडा चौकातील किशोर लॉटरी सेंटरचे मालक हसमुखलाल मनसुखलाल शहा (वय ६४, रा. वखारभाग, सांगली) यांचा पाठलाग करून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी खुनी हल्ला करण्यात आला. माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाजवळील आप्पासाहेब पाटीलनगरमध्ये आज, शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. घटनेनंतर दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले आहे. हल्ला का व कोणी केला, याचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना रात्री उशिरापर्यंत यश आले नाही.
या हल्ल्यात शहा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर टिंबर एरियातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर असे पाच घाव बसले आहेत. यामध्ये डोक्यावरील घाव वर्मी बसला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. शहर पोलिसांनीही घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली. शहा हे बेशुद्ध आहेत. यामुळे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला नाही. नातेवाइकांकडेही चौकशी करण्यात आली. तथापि त्यांनाही काहीच माहीत नसल्यामुळे हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहा यांचे एका पतसंस्थेशी आर्थिक कारणावरून वाद सुरू आहेत. हा वाद सध्या ग्राहक न्यायालयात सुरू आहे. न्यायालयात आज (शनिवार) सुनावणी असल्याने ते स्कूटरवरून निघाले होते. हल्लेखोर दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करीत होते. मात्र हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. आप्पासाहेब पाटीलनगरमध्ये हल्लेखोरांनी त्यांच्या स्कूटरला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर पडले. त्यानंतर दोन हल्लेखोर दुचाकीवरून उतरले. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या परिसरात वर्दळ कमी असते. यामुळे शहा यांच्या मदतीला कोणीच आले नाही. ग्राहक न्यायालय घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर होते. शहा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शहा यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.