घनशाम नवाथे
सांगली : शेतमजूर महिला हानिफाबी मदनसाब मुल्ला (वय ६५, रा. साईनगर, इस्लामपूर) यांच्या खुनातील संशयित मुवाज इलाही मुलाणी (वय २१, ईदगाहजवळ, इस्लामपूर) याने सांगलीत जिल्हा कारागृहात रवानगी करताना बेड्या काढून धूम ठोकली. सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांची पळापळ झाली. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके मागावर निघाली. दीड तासातच मुवाज याला मिरज स्थानकावर रेल्वेतून पलायन करताना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, संशयित मुवाज हा चैनीखोर होता. चैनीसाठी तो चोऱ्या करत होता. पैशासाठी त्याने हानिफाबी मुल्ला या वृद्धेला शेतात काम आहे, असे सांगून नेले. कापूरवाडी ओढ्याजवळ पाठीमागून डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मुल्ला यांच्या गळ्यातील व नाकातील सोन्याचे दागिने काढून घेतले. मंगळवारी, दि. ३ रोजी सकाळी मुल्ला यांचा मृतदेह आढळून आला. खुनाच्या घटनेत मुवाज याने कोणताही पुरावे सोडला नव्हता. परंतू पोलिसांनी कौशल्याने तपास करून बुधवारी छडा लावला. मुवाज याला गजाआड केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मुवाज हा कोठडीत असताना वैद्यकीय कारणास्तव त्याची पोलिस कोठडी रद्द करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार मुवाज याला न्यायालयीन कोठडी सुनावली. इस्लामपूर पोलिस सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला घेऊन सांगलीतील राजवाडा चौकातील मध्यवर्ती कारागृहासमोर आले. तेथे आतमध्ये सोडण्यापूर्वी त्याचा खायला आणण्यासाठी पोलिस कर्मचारी निघाला. एकच पोलिस त्याच्याजवळ होता. तेवढ्यात बेड्यातून हात सोडवून मुवाज पळाला. त्यामुळे कारागृहाच्याबाहेर पळापळ आणि आरडाओरड सुरू झाला. अंगकाठीने बारीक असलेला मुवाज क्षणात परिसरातून गायब झाला. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली. इकडे पोलिसांचे संचलन सुरू असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी त्यात सहभागी होते. परंतू माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणसह सांगली शहर पोलिस त्याच्या मागावर निघाले. मुवाज तेवढ्यात मिरजेत पोहोचला. रेल्वेत बसून तो पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिस पोहोचले. तत्काळ त्याला बेड्या ठोकून सांगलीत आणले. रात्री उशिरा त्याच्यावर पलायनाचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
पलायनाची बढाई अंगलटमुवाज याने पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पलायन केल्यामुळे त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. तेवढ्यात त्याने एकाच्या मोबाईलवरून ओळखीच्या व्यक्तीस कॉल करून पोलिसांना चकवा दिल्याचे सांगितले. परंतू येथेच तो फसला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा माग काढला. रेल्वेतून पळून जाण्यापूर्वीच पकडले.
पोलिसांची सुरक्षा कुचकामीखुनातील संशयिताला कारागृहात सोडताना पुरेसा बंदोबस्त हवा होता. परंतू इस्लामपूर पोलिसांनी त्याची दक्षता घेतली नाही. त्यामुळे संधी मिळताच मुवाज याने पलायन केले. पकडल्यामुळे पोलिसांची अब्रू वाचली. परंतू या निमित्ताने सुरक्षा कुचकामी असल्याचे दिसून आले.