इस्लामपूर (जि. सांगली) : पेठ (ता. वाळवा) येथे दोन सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सचिन सुभाष लोंढे (वय ३७, रा. साठेनगर, पेठ) या शेजारील तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना नववर्षाच्या आदल्या रात्री घडली. अण्णा भाऊ साठे नगर परिसरात मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली. यातील संशयित हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.सचिन लोंढे याच्या खूनप्रकरणी भाऊ राजेंद्र सुभाष लोंढे (मूळ रा. पेठ, सध्या रा. आष्टा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संग्राम कमलाकर शिंदे (वय २६, रा. साठेनगर, पेठ) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.मंगळवारी रात्री शरद कमलाकर शिंदे हा आपल्या बहिणीसोबत घराकडे निघाला होता. यावेळी मद्य प्राशन केलेल्या संग्राम याने त्याचा भाऊ शरद याच्यासोबत भांडण करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत होता. त्यावेळी तेथून निघालेल्या सचिन लोंढे याने या दोन भावांमधील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्याचा संग्राम याला राग आला. या रागाच्या भरात त्याने चाकूसारखे धारदार हत्यार काढून त्याने थेट सचिन लोंढे याच्या छातीवर वार केला. हा एकच वार वर्मी लागून सचिनचे फुफ्फुस निकामी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तेथेच गतप्राण झाला.
Sangli: सख्ख्या भावांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्याचा खून, संशयित हल्लेखोर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:01 IST