महापालिका-माधवनगरमध्ये सांडपाण्यावरून संघर्ष सुरू
By Admin | Updated: January 29, 2015 00:13 IST2015-01-28T23:07:48+5:302015-01-29T00:13:20+5:30
सांडपाणी लोकवस्तीत : रस्त्यावरून वाहू लागली गटार

महापालिका-माधवनगरमध्ये सांडपाण्यावरून संघर्ष सुरू
सांगली : माधवनगर गावातून वाहत येणारे सांडपाणी सध्या कर्नाळ रस्ता ओलांडून महापालिकेच्या हद्दीतील लोकवस्तीत शिरले आहे. गेल्या आठवड्यापासून ही परिस्थिती असल्याने परिसरात व माधवनगर रेल्वे स्टेशन परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. माधवनगर ग्रामपंचायतीला नोटीस बजावून महापालिका नामानिराळी झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.
कर्नाळ रस्त्यावरील माधवनगर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मंगेशीनगरसह अन्य नगरांमध्ये सांडपाणी शिरले आहे. येथील अनेक घरांना आता सांडपाण्याचा वेढा पडला आहे. माधवनगर जकात नाक्याकडून कर्नाळ, पद्माळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत माधवनगर हद्दीत मोठी गटार आहे. या गटारीतील सांडपाणी पूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात जात होते. काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्याने हे सांडपाणी सोडण्यास विरोध केला. त्यानंतर हे सांडपाणी रस्ता ओलांडून पालिका हद्दीतील शिवोदयनगर तसेच मंगेशीनगर भागात सोडण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात सांडपाणी आल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यात या गटारीवर कत्तलखाने असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेच्यावतीने देण्यात आला होता. पालिकेने ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याप्रकरणी ८ जानेवारीस नोटिसा बजाविल्या होत्या. तरीही ग्रामपंचायतीने याची कोणतीही दखल घेतली नाही. (प्रतिनिधी)
उशिरा येते जाग -एखाद्या रोगाची साथ येण्यापूर्वी महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. गॅस्ट्रोची साथ येण्यापूर्वी महापालिकेला नगरसेवकांनीच पत्र देऊन सतर्क केले होते. आरोग्य विभागाला मात्र साथ पसरल्यानंतर जाग आली. माधवनगर येथील सांडपाण्याबाबतही अशीच स्थिती आहे. याठिकाणी साथ आल्यावर किंवा एखाद्याचा जीव गेल्यावर महापालिकेला जाग येणार का?, असा संतप्त सवाल येथील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.