कोरोना नियंत्रणासाठी महापालिका पुन्हा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:35+5:302021-06-29T04:18:35+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. पाॅझिटिव्हिटी दरातही वाढ झाल्याने महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीची ...

कोरोना नियंत्रणासाठी महापालिका पुन्हा रस्त्यावर
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. पाॅझिटिव्हिटी दरातही वाढ झाल्याने महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीची ठिकाणे, मुख्य बाजारपेठ, झोपडपट्ट्यांसह दाट लोकवस्तीवर लक्ष केंद्रित केले असून, ऑन स्पाॅट कोरोना चाचण्यांवर भर दिला आहे. आयुक्त, उपायुक्तांसह चारशेवर कर्मचारी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोना नियंत्रणासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. शहरातील हॉटस्पॉट, गर्दी, वर्दळीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. व्यापारी, कामगार, नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आरटीपीसीआर, अँटिजन चाचण्यांवर भर दिला आहे. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांच्या उपचारांची सोय करण्यात आली आहे.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचीही तातडीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, चार सहायक आयुक्त, दोन आरोग्याधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असे चारशेहून अधिकारी, कर्मचारी कोरोना नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करावे. लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांनी केले आहे.
चौकट
वीस समन्वयकांची नियुक्ती
शहरातील प्रत्येक प्रभागात एक असे २० समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर प्रभागात कोरोनाबाबत जनजागृती करणे, नागरिकांमध्ये प्रबोधन, लसीकरणाबाबत माहितीसह कोरोना चाचण्यांसाठी शिबिरे आयोजित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.