महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:38+5:302021-06-26T04:19:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा पाॅझिटिव्हीटी दर वाढत चालल्याने शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे ...

महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा पाॅझिटिव्हीटी दर वाढत चालल्याने शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे सकाळीच रस्त्यावर उतरले. मुख्य बाजारपेठेत व्यापारी, नागरिक, विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. दिवसभरात २००हून अधिक जणांची चाचणी करण्यात आली. यात कोणीही पाॅझिटिव्ह सापडले नाही.
अनलाॅकनंतर शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीला रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाने केलेले सर्वच प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यात गेल्या चार दिवसांपासून महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराचा पाॅझिटिव्हिटी दरही २० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे हे वैद्यकीय पथकासह रस्त्यावर उतरले. मारुती रस्त्यावरील विक्रेत्यांनी मास्कचा वापर केला आहे की नाही, याची तपासणी केली. तसेच जागेवर कोरोना चाचणीला सुरूवात केली. यावेळी सुमारे २००हून अधिक नागरिक, व्यापारी, विक्रेत्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात कोणीही पाॅझिटिव्ह आढळला नाही. या मोहिमेत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर कांबळे, प्रणील माने, गणेश माळी, वैभव कुदळे, अंजली कुदळे, कोमल कुदळे व जामवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले होते.
चौकट
शहरात १९ पथके तैनात
कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी महापालिकेच्या टास्क फोर्सची ९ ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त १० पथकेही तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी महापालिकेच्या टास्क फोर्सकडून २१ जणांवर कारवाई करून ८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. शनिवारपासून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.