आचारसंहितेनंतर महापौर बदलाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:01 IST2019-05-14T00:01:19+5:302019-05-14T00:01:24+5:30
सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेत महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांनी अडीच वर्षात तीन ...

आचारसंहितेनंतर महापौर बदलाच्या हालचाली
सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेत महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांनी अडीच वर्षात तीन महापौर करण्याची घोषणा केली होती. त्यातच विद्यमान महापौरांचा दहा महिन्यांचा कालावधी जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.
महापालिकेत काँग्रेसची दीर्घकालीन सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपने सत्ता काबीज केली होती. गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ४१ नगरसेवक निवडून आले, तर दोन अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. सध्या महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत. भाजपने पहिल्यांदाच सत्तेत आल्याने महापौर, उपमहापौर, गटनेता या प्रमुख पदांवर अनुभवी नगरसेवकांना संधी दिली. महापौर पदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस होती. गेली २० वर्षे नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या संगीता खोत यांच्यासह नव्याने निवडून आलेल्या सविता मदने, कल्पना कोळेकर, अस्मिता सलगर, उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, गीता सुतार यांचा इच्छुकांमध्ये समावेश होता, तर अनारकली कुरणे सर्वसाधारण महिला गटातून विजयी झाल्या असल्या तरी, त्यांच्याकडे ओबीसीचा दाखला असल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा होती. अखेर अनुभवी संगीता खोत यांनी महापौर पदावर बाजी मारली.
महापौर निवडीवेळी भाजपच्या नेत्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत तीन महापौर करणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्येक महापौरास दहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार विद्यमान महापौर संगीता खोत यांचा कार्यकाल जूनअखेरीस संपणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेत सामसूम आहे. आचारसंहिता संपल्यानंतर महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. इच्छुकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात
केली आहे. जुलै महिन्यात नव्या महापौरांची निवड व्हावी, यासाठी इच्छुक सरसावले आहेत.
सांगलीला संधी मिळण्याची शक्यता
सध्या महापौरपद मिरज शहराकडे आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता, पुढील महापौर सांगलीचा होईल, असा अंदाज आहे. सांगलीतून महापौर पदासाठी गीता सुतार, अनारकली कुरणे, सविता मदने यांची नावे चर्चेत येणार आहेत. यापैकी कुरणे या अनुभवी नगरसेविका आहेत, तर सुतार व मदने या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी, भाजपच्या राजकीय गणितात त्यांची नावे आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.