विवाहापेक्षा नोंदणीचा त्रास अधिक
By Admin | Updated: August 10, 2015 00:58 IST2015-08-10T00:58:54+5:302015-08-10T00:58:54+5:30
नवविवाहितांची दमछाक : कागदपत्रांची सक्ती

विवाहापेक्षा नोंदणीचा त्रास अधिक
सहदेव खोत- पुनवत -एकवेळ विवाह ठरविणे व विवाह करणे सोपे जाईल, परंतु सध्या विवाह नोंदणी करणे मात्र नागरिकांना फारच त्रासदायक ठरत आहे. विवाहानंतर विवाहाच्या नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे, छायाचित्रे यांची जुळणी करताना नवविवाहित जोडप्यांची पुरती दमछाक होत आहे. मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. विवाह नोंदणीची प्रक्रिया शासनाने एवढी अवघड का केली आहे? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
सध्याच्या काळात वर्षाच्या बारा महिन्यांपैकी बहुतांशी महिन्यात विवाह होतच असतात. लोक सध्याच्या महागाईचा विचार करुन विवाहकार्य मोठा डामडौल न करता झटपट उरकून घेतात. सर्वसामान्य लोक तर ‘यादी पे शादी’ पद्धतीने विवाह उरकून घेत असल्याचे चित्र आहे.
विवाहानंतर वर पक्षाकडील लोक आपापल्या भागातील ग्रामपंचायती, नगरपरिषद, महापालिका आदी ठिकाणी विवाहनोंदणी करतात, परंतु अलीकडच्या काळात विवाह नोंदणीच एवढी अवघड झालेली आहे की, नवविवाहित जोडप्यांना विवाह करताना जेवढा त्रास झालेला नसेल, तेवढा त्रास नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या जुळणीसाठी होत आहे.
सध्या नोंदणीसाठी वधू-वरांचा शाळा सोडलेला दाखला, त्यांचे रेशन कार्ड झेरॉक्स, फोटो, लग्नपत्रिका, तीन साक्षीदारांचे फोटो व त्यांच्या रेशन कार्डची झेरॉक्स, पुरोहित किंवा भटजीचा दाखला व त्यांचे रेशन कार्ड झेरॉक्स अशी कागदपत्रे लागतात. ही सर्व कागदपत्रे व छायाचित्रांची व्यवस्था करताना वर पक्षाकडील मंडळींची दमछाक होत आहे. या प्रक्रियेत त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
यापूर्वीच्या काळात विवाह नोंदणी सहजरित्या करता येत होती. परंतु या प्रक्रियेसाठी शासनाने भरमसाठ कागदपत्रे व छायाचित्र सक्तीचे केल्याने सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने विवाह नोंदणीसाठी पूर्वीसारखीच पद्धत अंमलात आणावी, अशी मागणी होत आहे.