मदनभाऊ गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न : जयश्रीतार्इंच्या राष्ट्रवादी प्रवेशात काटेच अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 18:58 IST2020-02-20T18:57:54+5:302020-02-20T18:58:33+5:30
अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्या असतानाही त्यांना एकाही बैठकीचे निमंत्रण दिले जात नाही, अशी तक्रार त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यातच जिल्हा काँग्रेसमध्येच मोठी गटबाजी आहे. या साऱ्या कारणांमुळे जयश्रीतार्इंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा अधिकच गडद होऊ लागली आहे.

मदनभाऊ गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न : जयश्रीतार्इंच्या राष्ट्रवादी प्रवेशात काटेच अधिक
सांगली : काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. अद्याप त्यांनी ठोस निर्णय घेतला नसला तरी, त्यांच्या समर्थकांनी चार दिवस जाऊ द्या, चित्र स्पष्ट होईल, असा सूर आळवला आहे. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशात काटेच अधिक आहेत. आधीच राष्ट्रवादीत मोठी गटबाजी आहे. त्यात पाटील यांचा कॉँग्रेसअंतर्गत जसा गट आहे, तसाच मदनभाऊ समर्थक म्हणून स्वतंत्र गट आहे. या गटाचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. महापालिकेत तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी या गटाला जुळवून घ्यावे लागणार आहे.
राज्याच्या राजकारणात कधीकाळी वसंतदादा घराण्याचा दबदबा होता, पण आता हा दबदबा कमी झाला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी दादा घराण्याचा विचारच पक्षश्रेष्ठींनी केला नाही. प्रदेशस्तरावर कोणीच ‘गॉडफादर’ नसल्याने दादा गटाची घुसमट होत आहे. त्यात दादा घराण्याच्या स्नुषा व मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील याही काँग्रेसमधील राजकारणामुळे अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी त्यांना विश्वासात घेतले नाही. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्या असतानाही त्यांना एकाही बैठकीचे निमंत्रण दिले जात नाही, अशी तक्रार त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यातच जिल्हा काँग्रेसमध्येच मोठी गटबाजी आहे. या साऱ्या कारणांमुळे जयश्रीतार्इंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा अधिकच गडद होऊ लागली आहे.