जलशुद्धीकरण केंद्रातून मुरूम चोरीची तक्रार
By Admin | Updated: January 29, 2015 23:39 IST2015-01-29T23:25:03+5:302015-01-29T23:39:09+5:30
पोलिसांना निवेदन : अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

जलशुद्धीकरण केंद्रातून मुरूम चोरीची तक्रार
सांगली : महापालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील आवारातून तीन डंपर मुरुम नेत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेंद्र थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे डंपर अडविले. मुरुम नेण्याबाबतची महसूल तसेच महापालिकेच्या परवानगीची कागदपत्रे दाखविण्याबाबत टाळाटाळ झाल्यानंतर हा चोरीचा प्रकार असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास माळबंगला येथे जेसीबी (क्र. एमएच 0९, एक्यु ८६६९) ने हा मुरुम डंपरमध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी थोरात व अन्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याठिकाणी गेले. त्यांनी याप्रकरणी चौकशी केली असता, हा मुरुम पाणीपुरवठा अभियंता जे. व्ही. गिरी यांच्या आदेशाने नेण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी व सुरक्षारक्षकाने सांगितले. त्यानंतर महसूल व महापालिकेच्या परवानगी पत्राबाबत संबंधित डंपरचालकांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत विश्रामबाग पोलिसांत याप्रकरणी तक्रार केली. त्यांनी संजयनगर पोलिसांना याची कल्पना दिली. महापालिकेची याप्रकरणी तक्रार महत्त्वाची असल्याने पोलिसांनी पाणीपुरवठा अभियंत्यांकडे चौकशी केली व तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. या प्रकरणात अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिलिभगत असल्याचे थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)