सांगली : देशाचे वार्षिक बजेट ३४ लाख कोटी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार निर्मितीसाठी १०० लाख कोटी देण्याची घोषणा करीत आहेत. खोटे बोलून बेरोजगार तरुणांची कुचेष्टा केल्याबद्दल मोदी सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत, असे रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी पत्रकात म्हटले आहे.
वेटम यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, २०२१-२२ या वित्तीय वर्षाचे भारताचे बजेट हे ३४.८३ लाख कोटी आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषणात म्हटले की, ते बेरोजगार तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी १०० लाख करोड रुपये देणार. जेवढे बजेट भारतीय अर्थव्यस्थेचे एका वर्षामध्ये नाही त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त असणारी ही रक्कम पंतप्रधान कोठून आणणार? जगाच्या इतिहासात इतके आत्मविश्वासाने खोटे कोणीही बोलले नसेल. मोदींच्या या भाषणाचा सोशल मीडियातून संताप व्यक्त होत आहे. मोदींनी बेरोजगार तरुणांची, जनतेची माफी मागावी.
देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील उच्चांक गाठलेला आहे, कोरोना कालावधीत लाखो तरुणांनी आपला रोजगार गमावलेला आहे. असे असताना गेल्या तीन वर्षांतील भाषणात माेदींनी जाहीरपणे खोटे बोलल्याचे दिसून आले. मोदी सरकारकडून झपाट्याने खासगीकरण होत आहे आणि यातच अशी जुमलेबाजी होत आहे. संवेदनहीन मोदी सरकारचा जाहीर निषेध आम्ही करीत आहोत, असे अमोल वेटम म्हणाले.