मोदी-शहांनी पुन्हा लोकसभा निवडणुका घेऊन दाखवाव्यात : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 20:45 IST2020-01-25T19:17:07+5:302020-01-25T20:45:49+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे, आम्हाला पुरावे विचारणारे हे बाजारबुणगे कोण?

मोदी-शहांनी पुन्हा लोकसभा निवडणुका घेऊन दाखवाव्यात : जयंत पाटील
सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका घेऊन दाखवाव्यात, त्यातून लोक ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. नागरिकत्वविषयक कायद्यांना होणारा विरोधही त्यातून स्पष्ट होईल, असे आव्हान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. या कायद्याच्या निमित्ताने मोदी-शहांची जोडी देशाला पुन्हा एकदा फाळणीच्या वाटेवर नेत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केला. सांगलीत शनिवारी निघालेल्या संविधान संरक्षण मार्चमध्ये ते बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले की, देशातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपविरोधात देश पेटून उठला आहे. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याऐवजी फूट पाडण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकांत भाजपचा प्रचंड विजय झााला. बहुमत देऊन मोठी घोडचूक केल्याची भावना आता नागरिक बोलून दाखवत आहेत. नागरिकत्वविषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, त्यावेळी लोक तुम्हाला ताकद दाखवतील. त्यातून लोक कायद्याच्या बाजूने की विरोधात हेदेखील स्पष्ट होईल.
ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात आहे. हे अपयश सर्वस्वी मोदींचेच आहे. तिच्यात सुधारणा करण्याऐवजी धर्मा-धर्मांत तेढ वाढविण्याचे काम मोदी-शहा करत आहेत. कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर सामान्यांना चौकशीसाठी पोलिसांत बोलावले जाईल, पन्नासभर कागद मागितले जातील, छळवणूक करून वेठीस धरले जाईल, यातून दुही माजवली जाईल. याविरोधात दिल्लीत शाहीन बागेत महिलांचे आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर सांगलीतही वसंतदादांच्या पुतळ््यासमोर ‘वसंतबाग’ आंदोलन सुरू आहे. भाजपच्या धोरणांविरोधात या महिलांचा संताप व्यक्त होत आहे. या महिलांना सरकार म्हणून माझे पूर्ण समर्थन आहे.
मंत्री डॉ. कदम म्हणाले की, या कायद्यांच्या निमित्ताने देशात हुकूमशाही आणण्याचे प्रत्यत्न भाजप सरकार करत आहे. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या विविध जाती-धर्मांत विष पेरण्याचे काम सुरू आहे. काँग्रेसने कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही. नागरिकत्व कायद्यांविरोधातील लढ्यात काँग्रेस लोकांच्या खांद्याला खांदा देऊन लढेल. एकाही देशवासीयावर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या संरक्षणासाठी सरकार ताकद देईल.