उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर आमदार सुमनताई पाटील यांचे उपोषण स्थगित
By संतोष भिसे | Updated: October 3, 2023 19:01 IST2023-10-03T19:00:23+5:302023-10-03T19:01:07+5:30
..अन्यथा महिन्यानंतर मंत्रालयासमोर उपोषण

छाया : नंदकिशोर वाघमारे
सांगली : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील २३ गावांचा समावेश विस्तारित टेंभू योजनेत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. त्यानंतर आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण सायंकाळी मागे घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
आमदार अनिल बाबर यांची शिष्टाई यशस्वी झाल्यानंतर त्यांच्याहस्ते सुमनताई पाटील यांनी फळांचा रस घेतला. आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले. तासगाव तालुक्यातील आठ गावांचा समावेश विस्तारित टेंभू योजनेत करावा यासाठी दोघांनी सोमवारी सकाळपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी कालपासूनच वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु होते. पालकमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी मध्यस्थी केली, पण ठोस निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका सुमनताई व रोहित यांनी घेतली होती. रोहित यांनी प्रकृती चांगली नसतानाही आंदोलन सुरु ठेवले होते. मंगळवारी सकाळपासून मतदारसंघातून तसेच जिल्हाभरातून समर्थक कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डॉ. सिकंदर जामदार आदींनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. सरकारवर टीकास्त्र सोडले.
यादरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवसभरात दोनवेळा सुमनताई पाटील यांच्याशी मोबाईलवरुन संवाद साधला. मागण्या जाणून घेतल्या. सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे दोघांनी सांगितले. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदार बाबर यांच्यामार्फत सुमनताई यांच्याशी संपर्क केला. चर्चेअंती फडणवीस यांनी महिन्याभरात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे मान्य केले. त्यानंतर सायंकाळी सुमनताई व रोहित पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण
सुमनताई व रोहित पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार महिन्याभरात कार्यवाही झाली नाही, तर मंत्रालयासमोर उपोषण करु. मतदारसंघातील वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळेपर्यंत मागे हटणार नाही.