मिरजेत प्रांत कार्यालयातील काळ्या बाहुल्या काढल्या!
By Admin | Updated: August 12, 2015 23:29 IST2015-08-12T23:29:10+5:302015-08-12T23:29:10+5:30
सुधार समितीचा दणका : कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी

मिरजेत प्रांत कार्यालयातील काळ्या बाहुल्या काढल्या!
मिरज : मिरजेतील प्रांताधिकारी कार्यालयात दरवाजांवर टांगलेल्या काळ्या बाहुल्या शहर सुधार समितीच्या तक्रारीनंतर बुधवारी तातडीने काढून टाकण्यात आल्या. सुधार समितीच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे अनेक वर्षे अंधश्रध्देच्या जोखडात असलेली प्रांताधिकारी कार्यालयाची इमारत मुक्त झाली.
बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या अॅड. अमित शिंदे यांना कार्यालयाच्या दरवाजांवर काळ्या बाहुल्या टांगल्याचे निदर्शनास आले. अॅड. शिंदे यांनी समितीच्या रवींद्र चव्हाण व अन्य कार्यकर्त्यांना पाचारण केले. प्रांताधिकारी हेमंत निकम बुधवारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने समितीच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रध्देच्या या प्रकाराबाबत कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यानंतर टोलवाटोलवी केली. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत टांगलेल्या काळ्या बाहुल्यांची छायाचित्रे काढली. शासकीय कार्यालयात अंधश्रध्दा पसरवित असल्याने, जादूटोणा कायद्यान्वये तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा जाब विचारला. त्याप्रमाणे पत्र तयार करून कार्यालयात देण्यास गेल्यानंतर कार्यालयातील उलट्या टांगलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकण्यात आल्याचे दिसून आले. जिल्हा सुधार समितीच्या दक्षतेमुळे अंधश्रध्देच्या जोखडातून प्रांताधिकारी कार्यालयाची मुक्तता झाली.
याबाबत प्रांताधिकारी हेमंत निकम यांना विचारणा केली असता, कार्यालयात काळ्या बाहुल्या कोणी लावल्या व कोणी काढून टाकल्या, याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)