मिरज : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना तब्बल सव्वातीन कोटी रुपयाचा गंडा घालून फरार झालेला मिरजेतील ड्रीम मल्टीट्रेड सर्व्हिसेस कंपनीचा प्रमुख समीर अख्तर हुसेन (वय ४५, रा. तासगाव फाटा, मिरज) यास ग्रामिण पोलिसांनी अटक केली. समीर हुसेन यास न्यायालयाने दि. २०पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.योगेश शांतिनाथ घस्ते (रा. मिरज) व इतर ४०जणांना शेअर बाजारात रक्कम गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक केल्याबद्दल गतवर्षी २ जुलै २२ रोजी मिरज ग्रामीण पोलिसांनी समीर हुसेन याच्या विरोधात फसवणूक व एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेले दोन वर्ष फरारी होता. मिरज ग्रामीण पोलिसांनी समीर हुसेनला सोमवारी पलूस येथे अटक केली.समीर अख्तर हुसेन याने ड्रीम मल्टीट्रेड सर्व्हिसेस या नावाने बोगस कंपनी काढली होती. त्याने जादा परतावा देण्याच्या आमिषाने जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. योगेश घस्ते व इतर ४० जणांची ३ कोटी ३८ लाख रुपये घेऊन समीर हुसेन गेली दोन वर्षे फरार होता. पोलिसांना सापडत नव्हता. पलूस येथे नातेवाइकांकडे तो आल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी तेथे जाऊन समीर हुसेन यास पकडले. समीर हुसेनला पाच दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या समीर हुसेन याची मालमत्ता जप्त करून फसवणूक झालेल्या लोकांची रक्कम परत देण्याची मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी केली आहे.
Sangli: जादा परताव्याच्या आमिषाने सव्वातीन कोटींची फसवणूक, फरार आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 17:29 IST