सांगली जिल्ह्यात उद्धवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखासह, सिद्धार्थ जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:06 IST2025-03-26T19:05:53+5:302025-03-26T19:06:18+5:30
संजय विभुते यांना विरोध..

सांगली जिल्ह्यात उद्धवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखासह, सिद्धार्थ जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर
मिरज : जिल्ह्यातील उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह पदाधिकारी व सिद्धार्थ जाधव हे शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन दिवसात मुंबईत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला मिरजेची एकमेव जागा मिळाली होती. मात्र, तेथेही उद्धवसेनेला यश मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येणार या अपेक्षेने ठाकरे सेनेत इतर पक्षातील नेत्यांनी प्रवेश केला होता. मात्र, राज्यात महायुतीची सत्ता आल्याने ठाकरे सेनेतील पदाधिकाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संधान साधले आहे.
मिरजेतील नेते सिद्धार्थ जाधव, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांत सर्वांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याच्या वृत्ताला सिद्धार्थ जाधव यांनी दुजोरा दिला.
संजय विभुते यांना विरोध..
संजय विभुते यांच्या पक्षप्रवेशाला आमदार सुहास बाबर यांचा विरोध असल्याने विभुते यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेशाला संमती मिळविल्याची चर्चा आहे. शिंदेसेनेत प्रवेशानंतर संजय विभुते यांना जिल्हाप्रमुखपदाचे आश्वासन मिळाले आहे. मात्र, उद्धवसेनेतून येणाऱ्यांना कोणत्याही पदाचे आश्वासन दिले नाही. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणाऱ्यांना पद मिळणार असल्याचे शिंदेसेनेचे शहर प्रमुख किरणसिंग रजपूत यांनी सांगितले.