मिरजमध्ये मिरची व्यापाऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 1, 2015 00:51 IST2015-02-01T00:49:42+5:302015-02-01T00:51:49+5:30
व्यवसायात नुकसान : कर्जाची विवंचना

मिरजमध्ये मिरची व्यापाऱ्याची आत्महत्या
मिरज : व्यवसायात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्याने लक्ष्मण बाबू पवार (वय ५५, रा. नदीवेस, माळी गल्ली) या मिरची व्यापाऱ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने थकित रकमेचे व्याज वसूल केल्यामुळे लक्ष्मण पवार यांनी आत्महत्या केल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसांत केली आहे.
लक्ष्मण पवार मिरजेसह परिसरातील गावात आठवडा बाजारात मिरची विक्रीचा व्यवसाय करीत होते. गेल्या वर्षभरात मिरची व्यवसायात नुकसान झाल्याने सांगली मार्केट यार्डातील बापू नामक व्यापाऱ्याचे ९० हजार रुपये कर्ज झाले होेते. मिरचीचे देणे थकित असल्याने पवार यांना माल देणे बंद करण्यात आल्यामुळे पवार यांचा व्यवसाय पडला होता. पवार यांनी ४० हजार रुपये जमवून व्यापाऱ्यांला दिले. मात्र ही रक्कम थकित कर्जाचे व्याज म्हणून जमा करून घेऊन व्यापाऱ्याने पवार यांना व्यवसायासाठी पुन्हा माल देण्यास नकार दिला. थकित रक्कम दिल्यानंतरही माल मिळत नसल्याने पवार अस्वस्थ होते. व्यवसाय बंद असताना कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आज सकाळी घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
सांगलीतील बापू या व्यापाऱ्याने थकित रकमेचे व्याज वसूल केल्याने लक्ष्मण पवार यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पवार याच्या कुटुंबियांनी शहर पोलिसांत केली आहे. मूळचे कागवाडचे लक्ष्मण पवार मिरची विक्री व्यवसाया निमित्ताने मिरजेत स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. (वार्ताहर)