आयुष अभ्यासक्रमांसाठी बारावीतील किमान गुणांची अट रद्द, प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 19:07 IST2025-08-29T19:06:48+5:302025-08-29T19:07:36+5:30

विद्यार्थी, पालकांचा दिलासा

Minimum 12th standard marks requirement for Ayurveda, Homeopathy and Unani courses of AYUSH abolished | आयुष अभ्यासक्रमांसाठी बारावीतील किमान गुणांची अट रद्द, प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर 

संग्रहित छाया

सांगली : ‘आयुष’च्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयात ३०० पैकी किमान १५० गुण आवश्यक असल्याची अट आता काढून टाकण्यात आली आहे. या तीन विषयात केवळ उत्तीर्ण असले तरीही या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

आयुष मंत्रालयाने यासंबंधी पत्र सर्व राज्यांना पाठविले होते. सीईटी सेलने सर्वच अभ्यासक्रमांसाठी २३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधित नोंदणी प्रक्रिया तसेच एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी पहिली प्रक्रिया पार पडली. मात्र, आता वरील आदेशामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आयुष अभ्यासक्रमांसाठी आधी अर्ज केला नव्हता, अशा विद्यार्थ्यासाठी १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर या कालावधीत नव्याने अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

६ सप्टेंबरला गुणवत्ता यादी

यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. आयुष अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

अशी असेल पुढील प्रक्रिया

  • ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम देता येईल.
  • आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीचा निकाल १२ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येईल.
  • सीट मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येईल. आयुष अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरु होईल.

नीटच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याने १२ वीच्या अभ्यासाकडे अनेक विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आयुष अभ्यासक्रमांसाठी १२ वी च्या किमान गुणांच्या अटीची पूर्तता करण्यात अपयश आले होते. आयुष मंत्रालयाच्या नवीन नियमामुळे अनेक विद्यार्थ्यांना आयुष अभ्यासक्रमांना आता प्रवेश घेता येणार आहे. या मिळालेल्या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीयप्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

Web Title: Minimum 12th standard marks requirement for Ayurveda, Homeopathy and Unani courses of AYUSH abolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.