सामान्यांना डावलून मेट्रो उभारणी अयोग्य
By Admin | Updated: September 15, 2014 23:35 IST2014-09-15T23:34:47+5:302014-09-15T23:35:43+5:30
पी. आर. के. मूर्ती : अभियंता दिनी सांगलीत व्याख्यान; उपस्थितांना दिले ‘मेट्रो’चे धडे

सामान्यांना डावलून मेट्रो उभारणी अयोग्य
सांगली : भविष्यकाळात जलद वाहतुकीच्या सोयीसाठी मेट्रो अत्यंत उपयुक्त साधन ठरणार आहे. परंतु मेट्रोसाठी प्रकल्पाची उभारणी करताना त्या मार्गावरील सामान्यांच्या अडचणी समजून घेणे अत्यावश्यक आहे. सामान्यांशी चर्चा न करता कागदावर प्रकल्पाचे रेखाटन करून प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ करणे अयोग्य असल्याचे मत देशातील सर्व मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार पी. आर. के. मूर्ती यांनी व्यक्त केले.
अभियंता दिनानिमित्ताने इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते ‘भविष्यकाळातील दणवळणाच्या सुविधा आणि इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्ट यांची भूमिका’ याविषयी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह होते. यावेळी व्यासपीठावर एम. एम. आर. डी. ए. चे सहप्रकल्प संचालक शंकर देशपांडे, असो. चे अध्यक्ष प्रमोद परीख, सचिव रणदीप मोरे उपस्थित होते.
पी. आर. के. मूर्ती यांनी ‘स्लाईड शो’च्या माध्यमातून त्यांचा विषय समजावून सांगितला. मूर्ती म्हणाले, मेट्रोच्या उभारणीत इंजिनिअर आणि आर्किटेक्ट या दोघांचा महत्त्वाचा सहभाग आहे. चेंबूर ते अंधेरी मोनोरेलच्या उभारणीवेळी मधल्या मार्गात काही प्रार्थनास्थळे येत होती. परंतु त्याला धक्का न लावता नागरिकांशी संवाद साधल्यामुळे अवघड वाटणारे काम सोपे झाले. यासाठी ‘स्किल वर्क’ची आवश्यकता असते. भविष्यकाळात प्रमुख शहरात मेट्रोचे जाळे विस्तारत जाणार आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २५०० कोटी रुपयांच्या भुयारी मार्गातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या कामास प्रारंभ झाला आहे. ३२ कि.मी.चे अंतर असणारा हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर मुंबईतील लोकलवरील बराच ताण कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
टी. के. पाटील स्मृती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ उद्योजिका प्रभाताई कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास वास्तुविशारद प्रमोद चौगुले, एस. पी. तायवाडे, मुकुल परीख, प्रा. रमेश चराटे, शैलेंद्र केळकर, वाय. के. पाटील, प्रमोद शिंदे, उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सांगलीसाठी व्हिजन डॉक्युमेंट : कुशवाह
सांगली शहराच्या विकासासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात येणार असून, सांगली अधिकाधिक प्रगत करण्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली.
सांगलीसाठी व्हिजन डॉक्युमेंट : कुशवाह
सांगली शहराच्या विकासासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात येणार असून, सांगली अधिकाधिक प्रगत करण्यासाठी ही समिती प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली.