विटा : खानापूर तालुक्यातील विटा शहराजवळ असलेल्या कार्वे औद्योगिक वसाहतीत मेफॅड्रॉन (एमडी) ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर सोमवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. सुमारे २९ कोटी ७३ लाख ५६ हजार २०० रुपये किमतीचे एम.डी. ड्रग्ज हे अमली पदार्थ जप्त केले.याप्रकरणी पोलिसांनी बलराज अमर कातारी (वय २४, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेजवळ, विटा) याच्यासह प्रमुख सूत्रधार राहुदीप धानजी बोरिचा (वय ४१, रा. सुरत, गुजरात) व सुलेमान जौहर शेख (वय ३२, रा. बांद्रा, मुंबई) या तिघांना अटक केली. सांगली जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. यात मोठी साखळी असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केली.
कार्वे येथील औद्योगिक वसाहतीतून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईला जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्वे येथे सापळा लावला. त्यावेळी कार्वे औद्योगिक वसाहतीतील रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमधून पांढऱ्या रंगाची चारचाकी (एम.एच.-४३-एएन-१८११) बाहेर येताना पथकाच्या निदर्शनास आली. त्यावेळी पथकाने ही चारचाकी थांबवून चौकशी केली.त्या वेळी चालकाच्या बाजूला बसलेल्या बलराज कातारी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता एका काळ्या रंगाच्या सॅकमध्ये १४ किलो ८०६ ग्रॅम वजनाचे मेफॅड्रॉन एमडी ड्रग्ज पोलिसांना सापडले. या वेळी पोलिसांनी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकला. त्या वेळी तेथे असलेला राहुदीप बोरिचा व सुलेमान शेख याला ताब्यात घेतले. त्या वेळी त्यांनी एमडी ड्रग्ज याच कारखान्यात तयार करून मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन जात होतो, असे त्याने सांगितले.
या कारखान्यात रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. या वेळी पोलिसांना एमडी ड्रग्ज या अमली पदार्थासह तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे टोलीन, प्रॉपिलीन क्लोराईड, अल्युमिनियम क्लोराईड, हायड्रोक्लोरिक अॅसिड, क्लोरोफॉर्म, लिक्वीड ब्रोमाईन, मोनो मिथील अॅमाईन हे सर्व केमिकल असा मुद्देमाल जप्त असल्याचे घुगे यांनी सांगितले.
परफ्युमच्या नावाखाली उत्पादन..एमआयडीसीतील कारखान्याची जागा पूर्वी विट्यातील पाटील वस्तीवर राहणाऱ्या एका व्यक्तीची आहे. या जागेवरील शेड राहुदीप बोरिचा, सुलेमान शेख आणि बलराज कातारी यांना भाडेतत्त्वावर घेतली होती. त्या वेळी त्यांनी या कारखान्यात अत्तर, परफ्युम तसेच फिनेल तयार करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्यात कोणताही करार झाला नसल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.
तपास पथकाचे कौतुकविटा येथे झालेल्या कारवाईनंतर सायंकाळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषद घेतली. अमली पदार्थाविरोधात धडक कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे इशारा त्यांनी दिला. याचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे घुगे यांनी कौतुक केले.