महापालिकेच्या आणखी दोन भूखंडांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:49+5:302021-07-15T04:19:49+5:30
सांगली : महापालिकेच्या कुपवाडमधील खुल्या भूखंडावर प्लाॅट पाडून त्याची विक्री सुरू केली आहे तर सांगलीतील भूखंडावर २० लाखांचे कर्ज ...

महापालिकेच्या आणखी दोन भूखंडांचा बाजार
सांगली : महापालिकेच्या कुपवाडमधील खुल्या भूखंडावर प्लाॅट पाडून त्याची विक्री सुरू केली आहे तर सांगलीतील भूखंडावर २० लाखांचे कर्ज उचलण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
नगरसेवक मोहिते म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथील नियोजित प्रेरणा हौसिंग सोसायटीजवळ १३ हजार ९२८ चौरस फुटाचा खुला भूखंड आहे. महापालिकेने नाव न लावल्याचा गैरफायदा घेत या भूखंडाचे प्लॉटिंग करून विक्री केली जात आहे. पहिल्यांदा बिगरशेती लेआऊट ९ जानेवारी १९८८ रोजी मंजूर करून घेतला. त्यानंतरच्या दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडून गुंठेवारी प्रमाणपत्र घेतले. महापालिकेच्या या खुल्या भूखंडावर लेआऊटला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच बेकायदेशीर प्लॉट विक्री होत आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून कागदपत्रे तपासून बेकायदेशीर बांधकाम व प्लॉट विक्री थांबवावी. भूखंड महापालिकेने तत्काळ ताब्यात घ्यावा. संबंधितांची चौकशी करावी. फौजदारी गुन्हा दाखल करावा. या भूखंडाबाबत राजकांत चौगुले, अभिजित चौगुले, कृष्णा सावंत, मनीष महाजन या प्लॉटधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
साखळकर म्हणाले की, संजयनगर परिसरातील आठ गुंठ्याचा भूखंड मूळ मालकाकडून एकाने खरेदी केला होता. याबाबत न्यायालयात दावा दाखल होता. निकालानंतर महापालिकेने नगरभूमापन कार्यालयाकडे नाव लावण्याचा प्रस्ताव दिला. पण आजअखेर नाव लागलेले नाही. दरम्यान, या भूखंडावर संबंधिताने २० लाखांचे कर्ज घेतले आहे. हा भूखंडांचा बाजार कधी थांबणार?
चौकट
महासभेत आवाज उठविणार : मोहिते
कुपवाडमधील महापालिकेच्या खुल्या भूखंडाचा बाजार झाला आहे. महापालिकेचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. खुला भूखंड असताना गुंठेवारी प्रमाणपत्र देणाऱ्यांची व या प्रकरणाची चौकशी करावी. दोषींवर गुन्हा दाखल करावा, यासाठी येत्या महासभेत आवाज उठविणार असल्याचे नगरसेवक शेडजी मोहिते यांनी सांगितले.