उसाच्या ‘फुले २६५’ वाणाचे कारखानदारांना वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:31+5:302021-09-16T04:32:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कृषी संशोधकांच्या माहितीनुसार उसाच्या ‘फुले २६५’ वाणाचा उतारा १४ टक्क्यांपर्यंत असून, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. ...

उसाच्या ‘फुले २६५’ वाणाचे कारखानदारांना वावडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी संशोधकांच्या माहितीनुसार उसाच्या ‘फुले २६५’ वाणाचा उतारा १४ टक्क्यांपर्यंत असून, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र साखर कारखानदार उतारा कमी असल्याचे कारण देत या उसाच्या नोंदी घेण्यास तयार नाहीत. यामुळे ऊस उत्पादकांची कोंडी झाली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या संशोधनात फुले २६५ या वाणाचा तीनही हंगामात साखर उतारा १४.४० टक्के आढळला आहे. ८६-०-३२ या वाणात साखर उतारा १४.४७ टक्के आढळला आहे. फुले २६५ हा मध्यम ते उशिरा पक्व होणारा ऊस असून, थंडीचा कालावधी झाल्यानंतर दोन महिन्यात हा वाण तोडणीस योग्य होतो. सुरू ऊस १२ महिन्यांनी, पूर्व हंगामी ऊस १४ महिन्यांनी आणि आडसाली ऊस १६ महिन्यांनी तोडणी केल्यास या वाणास चांगला साखर उतारा मिळतो.
पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्राने फुले २६५ या वाणाची तीनही हंगामासाठी शिफारस केली आहे. २००९ पासून गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांसाठी लखनौ येथील अखिल भारतीय ऊस संशोधन केंद्रानेही शिफारस केली आहे. कोएम २६५ म्हणजेच फुले २६५ या ऊस वाणाच्या लागवडीस शासनाची परवानगी आहे. हा ऊस लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे. तरीही जिल्ह्यातील साखर कारखानदार या ऊस गाळपास नकार देत आहेत. नोंदणीही करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
चौकट
साखर आयुक्तांकडे तक्रार
‘फुले २६५’ उसाला फुटवा, वाढ चांगली आहे. खोड कीड, मावा, कांडी कीड, शेंडे कीड, अशा रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखाने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या या वाणाचा ऊस नेण्यास नकार देत आहे. नोंदीही घेत नाहीत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी साखर आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
कोट
‘फुले २६५’ उसाला उतारा कमी आहे. यामुळे उशिरा तोडी घेतल्या जात आहेत. कोणताही ऊस आम्ही नाकारत नाही. शेतकऱ्यांच्या हितालाच आम्ही प्राधान्य देतो.
-आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू साखर कारखाना