‘स्वाभिमानी’च्या एन्ट्रीने काँग्रेसचे नेते अस्वस्थ; 'या' तीन मतदारसंघाची केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 04:05 PM2019-09-29T16:05:25+5:302019-09-29T16:09:12+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019: Congress leader upset with entry of 'Swabhimani'; Demand for 'three' constituencies in Sangli | ‘स्वाभिमानी’च्या एन्ट्रीने काँग्रेसचे नेते अस्वस्थ; 'या' तीन मतदारसंघाची केली मागणी 

‘स्वाभिमानी’च्या एन्ट्रीने काँग्रेसचे नेते अस्वस्थ; 'या' तीन मतदारसंघाची केली मागणी 

Next

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी विधानसभेच्या सांगली जिल्ह्यातील मिरज, जत आणि खानापूरची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे केल्याचे जाहीर केले. शेट्टी यांनी मिरज व जत विधानसभा मतदारसंघाचा शनिवारी दौरा करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत आहे. हक्काचे मतदारसंघच काँग्रेसने मित्रपक्षांना सोडले, तर पक्षाचे काय, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आघाडी करण्याचे ठरले आहे. या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्षासह अनेक छोटे-मोठे पक्ष व संघटनाही सहभागी आहेत. या मित्रपक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे ५० जागांची मागणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र ३८ जागा मित्र पक्ष व संघटनांना सोडण्याचे निश्चित केले आहे. दोन दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल. त्यापूर्वी माजी खा. राजू शेट्टी यांनी मिरज, जत व खानापूर विधानसभा मतदारसंघांची मागणी केली आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघातून, तर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नावाची घोषणाही शेट्टी यांनी केली आहे. खानापूर मतदारसंघात काँग्रेसकडून यापूर्वी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २०१४ च्या निवडणुकीतही पाटील यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढविली होती. त्यांना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत. कारण, पक्षाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली नाही. पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल विचारले असता, ‘दोन दिवस थांबा, योग्य निर्णय जाहीरच करतो’, अशी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसकडून दुसरे उमेदवार राजाराम देशमुख इच्छुक असून, ते प्रदेश काँग्रेसचे सदस्य आहेत. मुंबई येथे व्यवसायानिमित्त स्थायिक होते. राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. बाबसाहेब मुळीक, आटपाडीचे रावसाहेब पाटील इच्छुक आहेत. या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडल्याच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे.

जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रम सावंत यांनी भाजपशी कडवी झुंज देऊन दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यास सावंत यांना थांबावे लागेल. नाही तर त्यांना विशाल पाटील यांच्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवावी लागेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र आमचे स्वतंत्र अस्तित्व असताना अन्य पक्षाला ही जागा सोडू नका, अशी मागणी केली आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. सिध्दार्थ जाधव, राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जनता दलानेही दावा केला आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये धाकधूक सुरू आहे. तथापि मिरजेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना अथवा जनता दलाकडे जाणार असल्याचे चित्र आहे.
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: Congress leader upset with entry of 'Swabhimani'; Demand for 'three' constituencies in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.