अलमट्टी धरणप्रश्नी महाराष्ट्राने भक्कमपणे बाजू मांडावी, सर्वपक्षीय कृती समितीने आमदार गाडगीळांना दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:53 IST2022-10-20T15:52:41+5:302022-10-20T15:53:12+5:30
जिल्ह्यातील सततची पुराची स्थिती व अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर त्यात होणारी वाढ याबाबतचा प्रश्न समितीने गाडगीळ यांच्यासमोर मांडला

अलमट्टी धरणप्रश्नी महाराष्ट्राने भक्कमपणे बाजू मांडावी, सर्वपक्षीय कृती समितीने आमदार गाडगीळांना दिले निवेदन
सांगली : अलमट्टी धरणाची उंची कर्नाटकने वाढवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने भक्कमपणे त्यांची बाजू मांडायला हवी. यासाठी सांगलीच्या आमदारांनी शासनाकडे आग्रह धरावा, अशी मागणी बुधवारी सर्वपक्षीय समितीने आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे केली.
सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार गाडगीळ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी पुढाकार घेऊन निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सततची पुराची स्थिती व अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर त्यात होणारी वाढ याबाबतचा प्रश्न समितीने गाडगीळ यांच्यासमोर मांडला. कर्नाटक सरकारने अतिरिक्त पाणीसाठा केल्याने सांगली, सातारा व कोल्हापूर या नदीपात्राच्या परिसरातील लोकांवर ओढवणारे महापुराचे संकट किती त्रासदायक होणार आहे, याबाबतचे मुद्दे यावेळी मांडण्यात आले.
मागील वर्षभरात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरण क्षेत्रात पावसाळ्यात होणारा पाणीसाठा पुराचे पाणी शहरात घुसण्याचे प्रमाण, अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे वाढणारी पाणीपातळी याबाबत अभ्यास करून तयार केलेली आकडेवारी यावेळी आमदारांसमोर सादर करण्यात आली. आमदार या नात्याने या विषयात पुढाकार घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री व संबंधित विभागाच्या सचिवांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करावी, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या विविध खटल्यांत राज्य शासनाच्या वतीने योग्य व भक्कम बाजू मांडण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सतीश साखळकर, विजयकुमार दिवाण, प्रदीप वायचळ, सतीश राजणे, उतम कांबळे, प्रशांत भोसले, तोहीद शेख, आनंद देसाई, डॉ. संजय पाटील, संजय कोरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांशी केली चर्चा
आमदार गाडगीळ यांनी याप्रश्नी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याविषयात लक्ष घालून लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन गाडगीळ यांनी दिले.