Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी
By संतोष भिसे | Updated: June 28, 2024 17:23 IST2024-06-28T17:23:01+5:302024-06-28T17:23:22+5:30
भुईकोट किल्लाची डागडुजी, मंदिरांचा जीर्णोद्धार करणार

Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी
विकास शहा
शिराळा : शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्यासह स्मृतिस्थळ उभारण्याच्या कामासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी १३.४६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पात केली आहे.
आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्मृतिस्थळासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. पवार यांनी १४ मार्च रोजी निधी मंजूर केला होता. आजच्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष तरतूद जाहीर करण्यात आली.
इतिहासात मोगल सैन्य छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद करून बहाद्दूर गडाकडे घेऊन जात असताना शिराळा येथे त्यांच्या सुटकेचा प्रयत्न झाला होता. भुईकोट किल्ला परिसरात महाराजांना सोडविण्यासाठी संघर्ष झाला. सरदार जोत्याजी केसरकर, सरदार आप्पासाहेब शास्त्री- दीक्षित, तुळाजी देशमुख, हरबा वडार व त्यांच्या सोबत असलेल्या ४०० मावळ्यांनी मोगलांशी संघर्ष केला. पण ते अयशस्वी ठरले. या संघर्षाची नोंद इतिहासात आहे. शिराळ्याच्या इतिहासासाठी हे सुवर्ण पान मानले जाते.
हा अभिमानास्पद समरप्रसंग पुढचील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी व त्याच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात यासाठी स्मृतीस्थळाची मागणी होत होती. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे. त्यासाठी १३.४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
आमदार नाईक म्हणाले, संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळामध्ये अनेक ऐतिहासिक घडामोडींचा समावेश असेल. भिंतीवरील शिल्पे, छत्रपती संभाजी महाराज अश्वारूढ पुतळा, किल्ल्याची तटबंदी, कोटेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर यांची दुरुस्ती व जीर्णोद्धार करणे, धारातीर्थी पडलेल्या वीरांची समाधी यांची उभारणी होईल. सर्व बांधकामांना ऐतिहासिक झालर असेल. पर्यटनासाठीही ही पर्वणी ठरणार आहे. उर्वरित निधी मागणीनुसार उपलब्ध होणार आहे.