Maharashtra Bandh : सांगली जिल्ह्यात रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शनांतून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:07 IST2018-08-09T16:59:51+5:302018-08-09T17:07:37+5:30
एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा अनेक घोषणांनी गुरुवारी क्रांतिदिनी सांगली जिल्ह्याचा कानाकोपरा दणाणला. रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शने अशा विविध प्रकारच्या आंदोलनांतून आरक्षणाचे वादळ दिवसभर घोंगावत राहिल्याने जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

Maharashtra Bandh : सांगली जिल्ह्यात रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शनांतून संताप
सांगली : एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा अनेक घोषणांनी गुरुवारी क्रांतिदिनी सांगली जिल्ह्याचा कानाकोपरा दणाणला. रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शने अशा विविध प्रकारच्या आंदोलनांतून आरक्षणाचे वादळ दिवसभर घोंगावत राहिल्याने जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यात गुरुवारी क्रांतिदिनी आरक्षण क्रांतीचा गजर करण्यात आला. सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिवसभर आंदोलनाची आग धुमसत राहिली. तरीही कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी आठपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली.
प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात एकाचवेळी आंदोलनाचे वारे वाहू लागले. या वाऱ्याचे नंतर वादळात रूपांतर झाले. बुधगाव, कवलापूर येथील आंदोलनकर्त्यांनी सांगली-तासगाव रस्त्यांवर टायर पेटविल्या. आंदोलनकर्त्यांकडून महामार्गांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शहरातील प्रमुख रस्तेही ओस पडले होते. रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. हातगाडी विक्रेते, रिक्षावाहतूक, बससेवा, खासगी वाहतूक, शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद राहिली. सर्वच क्षेत्रांवर बंदचा प्रभाव राहिला.
सांगलीच्या जुन्या स्टेशन चौकात सकाळपासून आंदोलनकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भगव्या लाटेत हा परिसर रंगून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी दिवसभर येथे ठिय्या आंदोलन केले. राजकीय नेत्यांना त्यांनी गर्दीत बसवून आंदोलनाचा झेंडा महिला व युवतींच्या हाती दिला. महिला व युवतींच्याहस्तेच मागण्यांचे निवेदन दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे देण्यात आले. यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या.
ठळक आंदोलने...
- सांगली शहरात दिवसभर ठिय्या आंदोलन
- वांगी येथे रस्त्यावर ठिय्या
- जत शहरात सकाळी मोर्चा
- विटा येथे धरणे
- कवठेमहांकाळमध्ये कडकडीत बंद
- शेडगेवाडीत तरुणांची रॅली
- करगणी-भिवघाट येथे रास्ता रोको
- सावंतपूर (ता. पलूस) येथे चक्का जाम
- बांबवडे (ता. पलूस) येथे तासगाव-कऱ्हाड रस्त्यावर ठिय्या
टायरी पेटविल्या
जिल्ह्यात ठिकठिकाणी टायर पेटवून रस्ते बंद करण्यात आले. मिरज तालुक्यातील बुधगाव, करोली टी, माधवनगर, अंकली, तसेच करगणी याठिकाणी टायर पेटवून संताप व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.