सांगली : उद्योग आणि शहराच्या विकासासाठी विमानतळ, महामार्ग गरजेचे आहेत. शासनाकडून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.तसेच कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळासाठी जागा अपुरी असल्यामुळे त्याठिकाणी चार्टर विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच शक्तिपीठ महामार्गाबाबतही शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली शहरासाठी विमानतळ गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; पण मोठ्या विमानाच्या धावपट्टीसाठी कवलापूर येथील जागा अपूर्ण आहे. जागा उपलब्ध होऊपर्यंत तेथे चार्टर विमानतळ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे प्रस्ताव ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे; पण शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्ग गरजेचे आहेत. म्हणून शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. लवकरच शक्तिपीठ महामार्गाचे कामही सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. भूसंपादनातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल, यासाठीही शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
Sangli: कवलापूरला चार्टर विमानतळ करूया - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:35 IST