ठेकेदार, समितीवर गुन्हे दाखल करू
By Admin | Updated: January 29, 2015 00:14 IST2015-01-28T23:02:48+5:302015-01-29T00:14:31+5:30
सतीश लोखंडे यांचा इशारा : चौदा पाणीपुरवठा योजनांमध्ये हलगर्जीपणाचा ठपका

ठेकेदार, समितीवर गुन्हे दाखल करू
सांगली : जिल्ह्यातील ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना अद्याप रखडल्या असून, त्यातील काहींनी त्या पूर्ण करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्या योजना पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. चौदा पाणी पुरवठा योजनांच्या कामातील हलगर्जीपणामुळे संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी आज, बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. सध्या जिल्ह्यात ६३ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी उंच टाकीचे काम न झालेल्यांमध्ये धुळकरवाडी, कंठी, लकडेवाडी, लमाणतांडा, पांढरवाडी, सोनलगी, जिरग्याळ, जालिहाल खुर्द आणि गुगवाड येथील योजनांचा समावेश आहे. तसेच समितीने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविलेल्यांमध्ये लिंगीवरे, करेवाडी, वळसंग, निगडी खुर्द आणि खटाव अशा एकूण चौदा योजना पूर्णपणे रखडलेल्या आहेत. त्यांना याबाबत वेळोवेळी संधीही देण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित योजनेशी संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा समितीवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
सुधारित मंजुरीकरिता आटपाडी पाणी पुरवठा समितीने शासनाकडे योजना पाठविली असून तिला मंजुरी मिळाली आहे. जाडरबोबलाद (ता. जत) येथे सुधारित कामाची आवश्यकता नसून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच सादर केलेल्या योजनांपैकी भिवर्गी आणि साळमळगेवाडी (ता. जत) येथील योजनांना अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. रखडलेल्या योजनांपैकी मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये लाडेगाव, मरळनाथपूर, शिरटे, गौरवाडी, बहाद्दूरवाडी, खरातवाडी, तर जून २०१५ मध्ये पूर्ण होणाऱ्या योजनांमध्ये इटकरे, बावची, ठाणापुडे, कुरळप, घोलेश्वर, खैराव, खंडनाळ येथील योजनांचा समावेश आहे. आॅगस्ट २०१५ पर्यंत तुजारपूर, येडेनिपाणी, बोरगाव या तीन योजना पूर्ण होणार आहेत. ऐतवडे खुर्द येथील योजना ही तक्रारीमुळे बंद करण्यात आली आहे. बनेवाडी, मिरजवाडी आणि नृसिंहपूर येथील योजना पूर्ण झाल्याचे बैठकीत निदर्शनास आले.
यापूर्वी गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड- सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अमृतवाडी येथील योजना समितीने तेथील योजनेकरिता आवश्यक असणारे पैसे शासनास परत केले आहेत.
उंच टाकीचे काम न झालेल्या योजनांपैकी करेवाडी - तिकोंडी आणि सुसलाद येथील योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बहे येथील योजनेने सुधारित तांत्रिक मंजुरी घेऊन निवीदा प्रक्रिया सुरू असल्याने तेथील कामही लवकरच सुरू होणार आहे. बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. सादिलगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
योजनांचा आराखडा सादर
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६३ योजनांचा कृती आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला. सध्या जिल्ह्यात १४ ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्या असल्याचे समोर आले आहे. गिरगाव, तुरची, आंबेवाडी, बिसूर, हळ्ळी, मिरवाड, नरवाड, टाकळी-बोलवाड - सुभाषनगर, संतोषवाडी, विजयनगर, बुर्ली, मल्लेवाडी आणि तांदुळवाडी या योजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोसारी, जानराववाडी, भोसे, बनाळी, रेवनाळ, ढवळेश्वर, मुचंडी, माडग्याळ या योजनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशीही माहिती सतीश लोखंडे यांनी दिली.