सांगली : महापालिका निवडणूक लढू इच्छिणाऱ्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रभागामध्ये लोकांत जावे, काम करावे. बाकीची चिंता माझ्यावर आणि खासदार विशाल पाटील यांच्यावर सोडा. आम्ही इर्षेने पेटलोय. साम, दाम, दंड वापरू, मात्र या महापालिका निवडणुकीत ४० पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.सांगलीत बुधवारी काँग्रेस कमिटीत आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ. विश्वजीत कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम, ज्येष्ठ नेते प्रा. सिकंदर जमादार, अय्याज नायकवडी, माजी नगरसेवक राजेश नाईक, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, शेवंता वाघमारे, वर्षा निंबाळकर, गजानन साळुंखे, सेवा संघाचे अध्यक्ष अजित ढोले आदी प्रमुख उपस्थित होते.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, वसंतदादा गट आणि कदम गटावर राजकीय दुकान चालवणाऱ्यांनी आता हे उद्योग बंद करावेत. काँग्रेस एकसंघ असून, आता पक्षात कोणतेही गट राहिलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत काय झाले तुम्ही पाहिले. यापुढेही काँग्रेससाठी रान उठवू, मात्र गटाची भाषा बंद करा. मी सांगलीत लक्ष घातले तर अडचण होईल, असे काहीजण खासदार विशाल पाटील यांचे कान फुंकतात. मला येऊन काहीतरी वेगळं सांगतात हे चालणार नाही. एकजुटीने पुढे जायचे आहे.आम्ही दोघे सांगलीत फिरायला लागलो, तर विरोधी पक्षाचे पालकमंत्री, आमदार, मोठी यंत्रणा सारे असूनही लोक सोबत उभे राहतील, हा माझा विश्वास आहे. त्यासाठी आधी तुम्ही उमेदवार म्हणून सक्षम व्हा. लोकांचा विश्वास जिंका. अडचणीत, सुख-दुःखात लोकांच्या पाठीशी उभे राहा. बाकी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, याची जबाबदारी आमची. तुमच्यासाठी मी ढाल बनून उभे राहू.
खासदार विशाल पाटील म्हणाले, महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. काही शंका असतील तर आपण त्यासाठी समिती गठीत करत आहोत. त्यांच्याशी संपर्क साधा. मतदार यादीवर लक्ष ठेवा. मतचोरी होते आहे का पाहा. दक्ष राहा. कोण पक्षात होते, निघून गेले, काळजी करू नका. ज्यांना जायचे होते, ते गेले, आता आपण आहोत, एकजुटीने लढू.
पक्षाने तुम्हाला आणखी किती द्यायचे?विश्वजीत कदम म्हणाले, भाजपमध्ये गेलेले नेते काँग्रेसमध्ये होते तेंव्हा प्रमुख नेते होते, त्यांचा सन्मान पक्षात होता. आज भाजपच्या गर्दीत त्यांचे स्थान कुठे आहे, शोधावे. जे तीन लोक एकमेकाविरुद्ध सांगलीत लढले, तेच आता एकत्र आले आहेत. गंमत आहे. तुम्ही गेलात, हरकत नाही. मात्र, नाहक आमच्यावर बोलू नका. तुम्हाला दोनवेळा उमेदवारी दिली. तुमचे प्रामाणिक काम केले. याहून अधिक बोलायची वेळ येऊ नये.
जयंत पाटील यांच्याशी चर्चाविश्वजीत कदम म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील यांच्याशी आम्ही निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करू. शिवसेनेसोबत चर्चा करू. एकजुटीने लढण्याचाच आमचा प्रयत्न असणार आहे. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळेल.