Sangli: बिबट्याची बछडे पुन्हा आईच्या कुशीत विसावली; वनविभाग, सह्याद्री रेस्क्यूच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:00 IST2025-11-28T14:00:00+5:302025-11-28T14:00:14+5:30
हृदयस्पर्शी घटना ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद

Sangli: बिबट्याची बछडे पुन्हा आईच्या कुशीत विसावली; वनविभाग, सह्याद्री रेस्क्यूच्या प्रयत्नांना यश
शिराळा : कापरी (ता.शिराळा) येथील शेतात ऊसतोडणी सुरू असताना, सुमारे १५ ते २० दिवसांची बिबट्याची दोन लहान पिले आढळून आल्याची घटना घडली. मात्र, वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने तातडीने आणि संवेदनशीलतेने बुधवारी केलेल्या कार्यवाहीमुळे केवळ दोन तासांत ही दोन्ही पिले पुन्हा आपल्या आईच्या सुरक्षित कुशीत विसावली.
बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कापरी येथील शिवाजी पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना, मजुरांना बिबट्याची दोन चिमुकली पिले दिसली. त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली.या माहितीनंतर उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, तसेच सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार गायकवाड, संतोष कदम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
दोन तासांत यशस्वी रेस्क्यू !
पथकाने सर्वप्रथम परिसरामध्ये पिल्लांची आई असण्याची शक्यता लक्षात घेऊन, संपूर्ण ऊसतोड थांबवली. त्यांनी दोन्ही पिल्लांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि परिसरातील नागरिकांना दूर राहण्याची विनंती केली, जेणेकरून मादी बिबट्या निर्धास्तपणे आपल्या पिल्लांना घेऊन जाईल.
बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी परिसरात तीन ट्रॅप कॅमेरे लावले. पिले ठेवून साधारण दोन तासांनी, म्हणजेच दुपारी साडेबारा वाजता, पिल्लांची आई त्या ठिकाणी आली. तिने आजूबाजूचा अंदाज घेतला आणि दोन्ही पिल्लांना घेऊन सुरक्षित ठिकाणी धूम ठोकली.
हृदयस्पर्शी घटना ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद
वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या या अत्यंत यशस्वी आणि संवेदनशील रेस्क्यू कार्यवाहीमुळे वन्यजीव आणि मानवी सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. पिल्लांना त्यांच्या आईची भेट घडवण्याची ही हृदयस्पर्शी घटना ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.