पुन्हा बिबट्याचे संकट, चिंचणी शिवारात बिबट्या दिसला, प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 19:44 IST2024-07-07T19:44:04+5:302024-07-07T19:44:29+5:30
वनविभागाने यावर लक्ष केंद्रीत करून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

पुन्हा बिबट्याचे संकट, चिंचणी शिवारात बिबट्या दिसला, प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण
- प्रताप महाडिक
कडेगाव : चिंचणी तालुका कडेगाव येथे पुन्हा एकदा बिबट्याचे संकट आले आहे. आज (ता.शनिवारी ) रात्री १२ वाजता चिंचणी ते वाजेगाव व पाडळी ते आसद रस्ता चौकालगत सिमेंटच्या पाईपवर बसलेला बिबट्या दिसला. याचा व्हीडीओ संतोष सातपुते व अक्षय पवार यांनी काढला आहे.
अक्षय पवार व संतोष सातपुते हे माजी आमदार मोहनराव कदम यांच्याकडे चालक म्हणून कार्यरत आहेत. ते दोघेही वाजेगाव कडून चिंचणीकडे फॉर्च्युनर कारमधून येत असताना त्यांना रस्त्यालगतच्या सिमेंट पाईपवर बिबट्या बसलेला दिसला. त्यावेळी कारमध्ये बाजूला बसलेल्या अक्षय पवार यांनी मोबाईल मध्ये शूटिंग घेतली. हा व्हीडीओ व्हायरल होताच या परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
वनविभागाने यावर लक्ष केंद्रीत करून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागील दोन महिन्यांपासून चिंचणी परिसरात बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
मागील महिन्यात माजी आमदार मोहनराव कदम यांचे स्वीय सहाय्यक सनिथ कदम यांच्या चिंचणी हद्दीतील वाजेगाव रस्त्यालगतच्या शेतातील घराच्या परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला.याची सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली चित्रफित व्हायरल झाली. आता आमदार डॉ.विश्वजित कदम स्वीय सहाय्यक सागर माने यांच्याही याच रस्त्याला असलेल्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.