Sangli: देवराष्ट्रे येथे युवकावर बिबट्याचा हल्ला; रॉट व्हिलर, बेल्जियम शेफर्डने बिबट्याला पळविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:01 IST2025-12-15T18:01:25+5:302025-12-15T18:01:49+5:30
बछडे झाडावर जाऊन बसले

Sangli: देवराष्ट्रे येथे युवकावर बिबट्याचा हल्ला; रॉट व्हिलर, बेल्जियम शेफर्डने बिबट्याला पळविले
देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील भरत साळुंखे हे शनिवारी दुपारी ऊस तोडत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. भरत यांनी चपळाईने हा हल्ला चुकवला, याचवेळी भरत यांच्या बरोबर असलेल्या दोन पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केल्यामुळे बिबट्याने व एका पिल्लाने तेथून पलायन केले.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील रामापूर रस्त्यावरील बोरीचा ओढा या परिसरात भरत साळुंखे यांचे शेत व घर आहे. घरासमोरील शेतामध्ये भरत साळुंखे ऊस तोडत होते. ऊस तोडत असताना शेताच्या जवळील ओढ्याच्या काठावरील झाडीतून हालचाली आवाज येऊ लागला म्हणून ते झाडीजवळ गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला; परंतु भरत यांनी प्रसंगावधानता राखत हा हल्ला चुकवला.
बछडे झाडावर जाऊन बसले
यावेळी भरत यांच्या बरोबर त्यांनी पाळलेले रॉट व्हिलर व बेल्जियम शेफर्ड जातीची दोन कुत्री होती. या दोन्ही कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला. यामुळे बिबट्याने व त्याच्या एका पिल्लाने घटनेच्या ठिकाणावरून उसाच्या शेतातून पलायन केले; परंतु बिबट्याची आणखी दोन पिल्ले ओढ्याच्या काठावरील झाडीमध्ये होती. दोन्ही कुत्री पिल्लांच्या दिशेने गेली असता भीतीने ही पिल्ले झाडावर जाऊन बसली. झाडाखाली दोन कुत्री व माणसे जमा झाल्याने अडीच-तीन तास बिबट्याची पिल्ले झाडावर होती.
ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्यावर लक्ष
भरत साळुंखे यांनी या घटनेची माहिती वनविभागाला कळवली, यानंतर सागरेश्वर अभयारण्याचे वनक्षेत्रपाल बालाजी चव्हाण व कर्मचारी, वनपाल एस. एस. कुंभार, एस. टी. गवते, वनरक्षक रोहन मेक्षे, एम. एम. मुसळे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मादी बिबट्या पिल्लांसाठी माणसांवर हल्ला करू शकते, या कारणास्तव घटनास्थळावरील लोकांना मागे सरकवत झाडावर अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लांना जाऊन दिले. याठिकाणी वनविभागाकडून सदर घटनेच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्यावर लक्ष ठेवले जात आहे.