‘कृष्णा’च्या सत्तेसाठी कुरघोड्यांचा बाजार
By Admin | Updated: January 30, 2015 23:17 IST2015-01-30T22:28:47+5:302015-01-30T23:17:01+5:30
साखरसम्राटांसह मातब्बरांचे लक्ष : एकमेकांचे विरोधक मनोमीलनाच्या तयारीत; आतापासूनच चुरस

‘कृष्णा’च्या सत्तेसाठी कुरघोड्यांचा बाजार
अशोक पाटील - इस्लामपूर -- दक्षिण महाराष्ट्रात सहकारी कारखानदारीत अग्रेसर असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार आहे. या निवडणुकीकडे याच परिसरातील साखरसम्राटांसह मातब्बरांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते आणि मदन मोहिते हे सत्तेसाठी एकमेकांवर कुरघोड्या करत असल्याची चर्चा असून, त्याला आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव उंडाळकर, डॉ. पतंगराव कदम हे नेते खत-पाणी घालत आहेत. त्यामुळे यावेळची कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील—उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले एकमेकांच्या विरोधात लढले. परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’च्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अविनाश मोहितेही डॉ. सुरेश भोसले यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. ते आता डॉ. इंद्रजित मोहिते यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, तर गत निवडणुकीत मदन मोहिते आणि इंद्रजित मोहिते एकत्रित असताना, यावेळी मात्र हे दोघेही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी सध्या तरी या निवडणुकीविषयी मौन पाळले आहे. विधानसभा निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते आणि मदन मोहिते यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार केल्याने, अंतिम टप्प्यात डॉ. भोसले निवडणुकीत पॅनेल उतरवून विधानसभेचे उट्टे काढतील. त्यासाठी अविनाश मोहिते यांचीही साथ घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहतील.
डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी माजी मंत्री पतंगराव कदम यांची मोठी यंत्रणा आहे, तर कृष्णाकाठचे बहुतांशी सभासद मदन मोहिते यांचे नेतृत्व मानून सवतासुभा मांडण्याच्या तयारीत आहेत. अविनाश मोहिते हे जयंत पाटील यांचे नेतृत्व मानत असल्याची चर्चा आहे. परंतु जयंत पाटील यांना या निवडणुकीत कितपत रस आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तरीसुध्दा ‘कृष्णा’वर वरचष्मा असावा म्हणून जयंत पाटील यांचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी विलासराव उंडाळकर यांचीही मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृष्णा कारखान्याची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. तरीसुध्दा सत्तेसाठी नेतेमंडळी आतापासूनच कामाला लागली आहेत. अविनाश मोहिते, डॉ. सुरेश भोसले, डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते हे एकमेकांच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढविणार, की स्वताकदीवर वेगवेगळी पॅनेल टाकून निवडणूक लढणार, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
राजकीय समीकरणे बदलणार...
विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील—उंडाळकर आणि डॉ. अतुल भोसले एकमेकांच्या विरोधात लढले. परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णा’च्या निवडणुकीत हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अविनाश मोहितेही डॉ. सुरेश भोसले यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. ते आता डॉ. इंद्रजित मोहिते यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, तर गत निवडणुकीत मदन मोहिते आणि इंद्रजित मोहिते एकत्रित असताना, यावेळी मात्र हे दोघेही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत. या कुरघोड्यांना आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव उंडाळकर, डॉ. पतंगराव कदम हे नेते खत-पाणी घालत असल्याची चर्चा आहे.