कुंडलापुरात महिलांचा जीव धोक्यात-: आडातील पाणी काढण्यासाठी जीवघेणी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:29 IST2019-02-28T23:28:09+5:302019-02-28T23:29:18+5:30
कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) गावासाठी केवळ एकच टॅँकर खेप येत असल्याने त्यासाठी नागरिकांची मोठी परवड होत असून, अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत

कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे आडातील पाणी काढण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
घाटनांद्रे : कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) गावासाठी केवळ एकच टॅँकर खेप येत असल्याने त्यासाठी नागरिकांची मोठी परवड होत असून, अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जीव धोक्यात घालून येथील महिलांना आडातील पाणी उपसा करावा लागत आहे. टॅँकरच्या खेपा वाढविण्याची मागणी होत असून, आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांच्यावतीने सरपंच पोपटराव गिड्डे (देशमुख) यांनी दिला आहे.
सततच्या दुष्काळाने परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने परिसरात कोठेही जलस्रोत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाण्यासाठी शासनाकडे मागणी केल्यानंतर प्रशासनाने दिवसाकाठी फक्त एक टॅँकरची खेप मंजूर केली. ती खेप गावातील ओढ्यालगत असणाऱ्या आडात ओतून त्यातून पाणी ग्रामस्थ नेत आहेत. तेही पाणी अपुरे असल्याने सर्वांना मिळत नाही.
पाणी पुरवठा करणाºया टॅँकरची पाण्याची क्षमताही १२००० लिटर आहे. प्रशासनाने माणसी २० लिटर या हिशेबाने पाणी पुरवठा केला असून, येथे जनावरांच्या पाण्याचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे जनावरे जतन कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
कुंडलापूर येथे लोकसंख्या ७५० असून, जनावरांची संख्या १०५३ आहे. साधारणत: दिवसाकाठी नागरिक व जनावरांना जादा पाणी लागत असताना, प्रशासनाने केवळ १ टॅँकर देऊन बोळवण केल्याने त्या पाण्याचा मेळ घालणे नागरिकांना जिकिरीचे बनत आहे.
प्रशासनाकडे वारंवार टॅँकरच्या खेपा वाढविण्याची मागणी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना जर आंदोलनाची भाषा कळत असेल तर, त्याचीही तयारी केली आहे.
- पोपटराव गिड्डे (देशमुख), सरपंच, कुंडलापूर