सांगली : कोयना व वारणा धरणातून वाढलेला विसर्ग आणि संततधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी बुधवारी सकाळी आठ वाजता ३४ फुटावर पोहोचली. शहरात कृष्णा नदी इशारा पातळीकडे जात असून सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट परिसरात नदीचे पाणी शिरले आहे. शहरातील १२७ नागरिकांना मंगळवारी रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अमरधाम स्मशानभूमी येथे पुराचे पाणी शिरले. त्यामुळे महापालिकेने कुपवाड स्मशानभूमी अंत्यविधीची व्यवस्था केली आहे.
कृष्णा नदीने पुन्हा धोक्याची घंटा वाजवली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता नदीची पातळी ३४ फूटांवर पोहोचली असून, इशारा पातळी अवघ्या ४० फूटांवर आहे. पाणीपातळी जसजशी वाढतेय तसतसा नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण आहे.
पहिला फटका बसला तो सूर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉटला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना घर सोडावं लागलं. आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त निखिल जाधव यांनी मंगळवारी रात्री पूरबाधित क्षेत्राला भेट देऊन नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सूर्यवंशी प्लॉट येथील ९ कुटुंबातील ५० नागरिक व आरवाडे पार्कमधील १० कुटुंबातील ७७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी अमरधाम स्मशानभूमीपर्यंत पोहोचल्याने तेथील दहनविधी बंद करण्यात आले आहेत. पर्याय म्हणून कुपवाड स्मशानभूमी येथे अंतिम संस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहेत.