क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे निधन; कृष्णा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:18 PM2021-09-23T14:18:59+5:302021-09-23T14:19:37+5:30

क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे वृद्धापकाळाने कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात निधन झाले.

kranti Virangana Hausabai Bhagwanrao Patil passed away in sangli | क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे निधन; कृष्णा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

क्रांतिवीरांगना हौसाबाई भगवानराव पाटील यांचे निधन; कृष्णा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

कडेगाव (जि. सांगली) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतीविरांगणा हौसाताई पाटील (वय ९५, रा. हणमंत वडिये, तालुका कडेगाव ) यांचे आज, गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. अँड. सुभाष पाटील यांच्या त्या आई होत. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. आज सायंकाळी ५ वाजता कराड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताईंचा जन्म १२ फेब्रुवारी १९२७ रोजी येडेमच्छिंद्र (तालुका वाळवा) येथे झाला. वडील नाना पाटील भारतीय  स्वातंत्र्यलढ्याचे सरसेनापती होऊन भूमिगत झालेले, मायेची पाखर देणारी आई बालपणीच अनंतात विलीन झालेली.

अशा स्थितीत आजी गोजराबाई यांनी हौसताई यांना आईचं प्रेम दिलं आणि त्यांचा सांभाळ केला. पोलीस सतत नाना पाटलांच्या पाळतीवर असल्याने आपल्या मुलीला भेटायला येता येत नव्हते. हौसताईंचा बालपणीचा आनंद स्वातंत्र्याच्या रणकुंडाने भस्मसात केलेला होता. आई वडिलांच्या मायेला हौसाताई पोरकी झालेली होती.आपली आजी हेच सर्वस्व होत पण आजीही साधी न्हवती नाना पाटलांच्या आईच त्या. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ त्यांच्याही नसानसात भिनलेली होती. आजीकडून सत्यशोधक चळवळीचे बाळकडू घेतच हौसाताई मोठ्या झाल्या.

 १९४० साली वयाच्या १३ व्या वर्षी  हणमंतवडिये येथील चळवळीतील तरुण भगवानराव पाटील(बप्पा) यांच्याबरोबर हौसाताईंचे लग्न झाले. हौसाताईंच्या लग्नानंतरच वर्षादोनवर्षातच पुन्हा भारतात स्वातंत्र आंदोलनाचा वणवाच पेटला. इंग्रज सरकारच्या विरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. हौसाताई यांचे पती भगवानराव पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांची चळवळ चालवायचे .पोलीस त्यांना पकडायला टपलेले घरातल्या बाकीच्या कर्त्या पुरुषांना बप्पांचा ठावठिकाना विचारण्यासाठी तुरुंगात डांबलेले परंतु न डगमगता हौसाताई घरच्या स्त्रियांना धीर देऊन घरातील व शेतीतील सर्व कामे करीत प्रसंगी बैलाकडून शेतीतील औत सुद्धा चालवीत. भिणे, डगमगणे हे सर्वसामान्याना पडणारे प्रश्न त्यांच्या शब्दकोशातच नव्हते. येईल त्या प्रसंगाला सामोरे जाणे एवढेच बाळकडू त्या प्यायल्या होत्या. त्यावेळी घरी सतत कार्यकर्त्यांचा राबता असल्याने त्यांची विचारपूस करणे, भूमिगत कार्यकर्ते व त्यांच्या कुटूंबियांमध्ये निरोपाची देवाणघेवाण करणे, प्रति सरकारच्या कालखंडात हत्यारांची ने-आण करणे , ती जपून लपवून ठेवणे. महत्वाच्या कार्यकर्त्यांकडे ती जबाबदारीने पोहच करणे, प्रसंगी जी.डी. बापू लाड यांच्यासमवेत गोव्यातून हत्यारे घेऊन येणे ही धाडसाची अवघड कामे हौसाताईंनी केली. क्रांतीविरांगणा हौसाताई यांना कित्येक संकटांचा सामोरे जावे लागले. त्यात गोव्याहून शस्त्र वाहून आणण्यासारखी कामे, आंबड्यातून संदेश पोहचवणे, हॉस्पिटलमधून सहीसलामत सुटका यांसारखे प्रसंग त्यांच्या जीवनात घडले. 

ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, त्या ब्रिटिश महाशक्ती विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या नाना पाटलांच्या लेकीला शोभेल अशा पद्धतीने हौसताईंनी कुशलतेने बिनधोक स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी  यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना क्रांतीविरांगणा ही पदवी बहाल करण्यात आली. हत्यारे नेआण करण्याचे काम त्या आवडीने करायच्या बंदुकीच्या गोळ्या तयार करण्याचा कारखाना काही महिलांना सोबत घेऊन त्या चालवत होत्या. ताईवर कामगिरी सोपवली की प्रतिसरकारचे कार्यकर्ते बिनघोर असत कारण क्रांतिसिंहाची लेक सिंहासारखेच काम फत्ते करतील असा त्यांचा ठाम विश्वास होता. रेल्वेचे रूळ उखडणे असो, तारा तोडणे असो, इंग्रजांचे बंगले जाळणे असो , नाहीतर पोलिसांच्या रायफली पळवणे असो या सर्व कामात हौसाताई आघाडीवर असत. स्वातंत्र्य चळवळीत कर्तबगार स्त्रियांना सोबत घेऊन पोलिसांच्या हातावर सतत तुरी देऊन  हौसाताईनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे काम केले.

विशेषतः भवनीनगर रेल्वे स्टेशन वरील पोलीसांच्या बंदुका काढून घेऊन त्या प्रतिसरकारातील स्वातंत्र्य सैनिकांना देणे आणि तेथील इरिगेशन बंगला जाळपोळ यात त्यांनी घेतलेला सहभाग केवळ उल्लेखनीय न्हवे तर आजही अंगावर रोमांच उभा करणारा आहे. सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्या चळवळी झाल्या त्यात त्या आघाडीवर होत्या , ताई घरोघर फिरून महिलांना एकत्र करून स्वातंत्र्याचा मंत्र त्यांच्या मनावर बिंबवत. ग्रामीण भागातून महिलांची फौजच हौसाताईंनी उभी केली होती.

गोवा मुक्तीसाठी सशस्त्र लढा उभा राहिला त्या लढ्यातही ताई उतरल्या होत्या. तिथे तरी पोलीस पकडायला आले असताना त्यांच्यावर पिस्तुल रोखून त्यांच्या हातावर तुरी देऊन त्या निसटल्या.आपल्या सहकार्यांना जेलमधून सोडवीण्याच्या मोहिमेमध्ये त्यांनी गोव्यातील अरबी समुद्राला मिळणारी मांडवी नदी रात्रीच्या ११-१२ वाजण्याच्या सुमारास पोहून पार केली.

१९४७ साली देश स्वतंत्र झाला.त्यानंतरच्या काळात १९५२ साली झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत पती भगवानराव पाटील विक्रमी मतांनी निवडून आले. महाष्ट्रामध्ये उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हौसाताई पाटील यांचे योगदान फार मोलाचे आहे. या आंदोलनात ताईंना अनेक वेळा अटक झाली.१९५५ मध्ये मुंबई मध्ये झालेल्या सत्याग्रहात सातारा जिल्ह्यातून ज्या महिला गेल्या होत्या त्यामध्ये हौसाताई पाटील अग्रभागी होत्या. २७ जुलै १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी मातीच्या न्याय्य मागणीसाठी दिल्ली येथे सरकारला जागे करण्यासाठी झालेल्या सत्याग्रहात सुद्धा त्या सहभागी होत्या.

१९५७  मध्ये मराठी भाषिकांच्या मनाचा विचार दिल्ली सरकार करत नव्हते म्हणून प्रतापगडावर हौसाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.१९५८ साली निपाणी येथे कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सत्याग्रह झाला त्यामध्ये त्या सहभागी होत्या त्यावेळी त्यांना ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला. अशा महिलांच्या योगदानातून १  मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर  महागाई, दुष्काळी प्रश्न, अवैध वाळू उपसा, सिंचन योजना अशा विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली.

Web Title: kranti Virangana Hausabai Bhagwanrao Patil passed away in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली