खानापूर, जतमध्ये राष्ट्रवादीला धक्का
By Admin | Updated: September 15, 2014 00:24 IST2014-09-15T00:15:15+5:302014-09-15T00:24:51+5:30
पंचायत समिती सभापती निवड : राजकीय समीकरणे बदलल्याचा परिणाम

खानापूर, जतमध्ये राष्ट्रवादीला धक्का
सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी आज, रविवारी पार पडल्या. राष्ट्रवादीने चार, काँग्रेसने तीन, तर आघाडीने एका पंचायत समितीवर वर्चस्व राखले. खानापूर व जत या दोन्ही तालुक्यांतील राजकीय समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला.
जिल्ह्यातील दहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दहापैकी सहा पंचायत समितीतील सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. काँग्रेसने पलूस, कडेगाव व मिरज या तीन पंचायत समितींवर वर्चस्व राखले. पलूसच्या सभापतिपदी विजय कांबळे, उपसभापती रंजना पवार, कडेगावच्या सभापतिपदी लता महाडिक, उपसभापतिपदी विठ्ठल मुळीक, तर मिरजेच्या सभापतिपदी दिलीप बुरसे व उपसभापतिपदी तृप्ती पाटील यांची निवड झाली. राष्ट्रवादीने चार पंचायत समितींवर वर्चस्व राखले. यात वाळवा, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळचा समावेश आहे. वाळव्यात रवींद्र बर्डे व भाग्यश्री शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली, तर शिराळ्यात चंद्रकांत पाटील यांची सभापतिपदी, तासगावच्या सभापतिपदी हर्षला पाटील, तर कवठेमहांकाळच्या सभापतिपदी वैशाली पाटील यांची निवड झाली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत आणि खानापूर या दोन मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जतचे विलासराव जगताप यांनी भाजपशी संधान साधले आहे, तर खानापूरचे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेशी नाते जोडले आहे. त्यामुळे या दोन्ही पंचायत समितीत राष्ट्रवादीला धक्का बसला. जतला जगताप समर्थक लक्ष्मी मासाळ यांची सभापतिपदी, तर ‘जनसुराज्य’च्या बिरदादा जहागीरदार याची उपसभापतिपदी निवड झाली, तर खानापुरात बाबर समर्थक वैशाली माळी व सुहास बाबर यांची अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदी निवड झाली. (प्रतिनिधी)