कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीला भोपळा

By Admin | Updated: August 11, 2015 00:33 IST2015-08-11T00:33:09+5:302015-08-11T00:33:09+5:30

बाजार समिती निवडणूक : काँग्रेस समर्थकांचा जल्लोष

In Kavtheemahal, NCP gets pumpkin | कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीला भोपळा

कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीला भोपळा

कवठेमहांकाळ : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने कवठेमहांकाळ तालुक्यात बाजी मारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती भोपळा आला. काँग्रेस उमेदवारांच्या विजयाने कार्यकर्त्यांनी तालुक्यात फटाके उडवून आणि गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि काँग्रेस समर्थकांमध्ये खुशीची लहेर पसरली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मात्र सन्नाटा होता.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, विशाल पाटील, विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखालील वसंतदादा रयत पॅनेलचे कवठेमहांकाळ तालुक्यातील तानाजीराव पाटील, प्रशांत शेजाळ, अजित बनसोडे आणि जयश्री पाटील हे उमेदवार विजयी झाले; तर माजी मंत्री जयंत पाटील, मदन पाटील, खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, विजयराव सगरे, सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनेलचे मनोहर पाटील, संजय पाटील, दादासाहेब कोळेकर आणि वर्षा लोंढे यांना नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.
तालुक्यात वसंतदादा रयत विरुद्ध शेतकरी सहकारी पॅनेल अशा अत्यंत चुरशीच्या सामन्याचे शनिवारी मतदान झाले. सोमवारी सकाळी आठ वाजताच कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते शहरात येऊन निकालाची प्रतीक्षा करीत होते. जसे निकाल बाहेर येऊ लागले, तशी घोरपडे आणि काँग्रेस समर्थकांत खुशी, तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत नाराजी पसरू लागली. दहा-साडेदहाच्या दरम्यान वसंतदादा रयत पॅनेलचे उमेदवार अजित बनसोडे यांच्या विजयाचा पहिला निकाल तालुक्यात येऊन धडकला. तेवढ्यात याच पॅनेलचे प्रशांत शेजाळ विजयी झाल्याचे समजले आणि वसंतदादा रयत पॅनेल समर्थकांनी जुने बस स्थानक, कवठेमहांकाळ ग्रामपंचायत, काँग्रेस कमिटी, दूध संघ, नवे बसस्थानक, साखर कारखान्यासमोर फटाके उडवून जल्लोष सुरू केला. (वार्ताहर)

रयत आघाडीची दिवाळी
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे समर्थक आणि काँग्रेसच्या समर्थकांनी, पॅनेल विजयाकडे वाटचाल करीत असल्याचे लक्षात येताच मिरज गाठले. तसेच तालुक्यातील गावा-गावात काँग्रेस, पतंगराव कदम, अजितराव घोरपडे यांच्या विजयाच्या घोषणांचा वर्षाव झाला. रयत पॅनेलचे समर्थक दिवाळी साजरी करीत असताना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मात्र सन्नाटा निर्माण झाला होता. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले गाव गाठले. सायंकाळी सहानंतर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि विजयी उमेदवार कवठेमहांकाळ येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली.

Web Title: In Kavtheemahal, NCP gets pumpkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.