कवठेमहांकाळ तालुका पुन्हा दुष्काळाच्या छायेत

By Admin | Updated: July 7, 2014 00:38 IST2014-07-07T00:36:53+5:302014-07-07T00:38:14+5:30

शेती व पाण्याचा प्रश्न गंभीर

Kavtehamahankh taluka again in the shadow of drought | कवठेमहांकाळ तालुका पुन्हा दुष्काळाच्या छायेत

कवठेमहांकाळ तालुका पुन्हा दुष्काळाच्या छायेत

कुची : कवठेमहांकाळ तालुका पुन्हा एकदा दुष्काळाच्या अस्मानी संकटाच्या छायेत दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने पेरणीच्या संकटाबरोबरच पशुधन जगविण्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.
कवठेमहांकाळ तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याने अनेकवेळा दुष्काळाशी मुकाबला केला आहे. यावर्षी जून महिना संपला, तरी पाऊस बरसला नाही. दोन-तीन नक्षत्रे कोरडी गेली. काही टक्केच पेरण्या झाल्या, मात्र पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने कृषी सेवा केंद्रांबरोबरच बाजारपेठही थंडावली आहे. विहिरी, तलावातील पाणीसाठे तळ गाठू लागले आहेत.
तालुक्यातील १0 पाझर तलाव व एक मध्यम प्रकल्पापैकी ६ तलावात मृतसंचय पाणीसाठा असून, तो केवळ महिनाभरच पुरेल इतका आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्याने तीन तलावात चांगला पाणीसाठा असून, तो आणखी दोन महिन्यांपर्यंत राहील, अशी स्थिती आहे, तर दोन तलावात अत्यल्प पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. १ जून ते ३0 जूनअखेर तालुक्यात केवळ ६0.१0 मि. मी. इतकाच पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा आकाशाकडे, पावसाच्या आगमनाकडे लागल्या आहेत. केवळ ढग येतात आणि पाऊस नाही, अशी स्थिती आहे. वेळेत पाऊस न झाल्यास तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.
तालुक्यातील जनावरांसाठी चारा डेपो, छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची आणि वाढ करण्याची स्थिती येणार की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. पेरण्या खोळंबल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Kavtehamahankh taluka again in the shadow of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.