Sangli: कवलापूर विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करणार - पालकमंत्री पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:53 IST2025-10-15T18:52:44+5:302025-10-15T18:53:54+5:30
१०० हेक्टर जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय

Sangli: कवलापूर विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करणार - पालकमंत्री पाटील
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ६६.३६ हेक्टर क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून व्हिजिबल सर्वे करण्यात येईल. तसेच, याठिकाणी येत्या दोन वर्षांत विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
मुंबई येथे मंत्रालयात कवलापूर विमानतळाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, सुहास बाबर, एमएडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, उपसचिव (विमान चालन) हेमंत डांगे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे, मुख्य अभियंता कालिदास भांडेकर उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी अशोक काकडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री पाटील म्हणाले, कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळच्या जागेसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने व्हिजिबल सर्वे लवकरच करण्यात येईल. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची याठिकाणी ६६.३६ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्राव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करावे लागणार आहे. यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मंत्री सामंत यांनी कवलापूर येथे होणाऱ्या विमानतळासाठी लागणारी जमीन विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे करून घ्यावा, असे आदेश दिले.