जयंतराव-सदाभाऊ कबड्डी मैदानावर एकत्र : इस्लामपुरात स्पर्धेतून रंगला डाव-प्रतिडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:42 IST2018-12-19T23:41:35+5:302018-12-19T23:42:28+5:30
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खोत आणि आमदार पाटील स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र आले असले तरी

जयंतराव-सदाभाऊ कबड्डी मैदानावर एकत्र : इस्लामपुरात स्पर्धेतून रंगला डाव-प्रतिडाव
अशोक पाटील ।
इस्लामपूर : इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खोत आणि आमदार पाटील स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र आले असले तरी, श्रेयवादासाठी मैदानावर मात्र डाव-प्रतिडाव आखले जात आहेत. त्यामुळे या स्पर्धेला राजकीय रंग चढला आहे.
इस्लामपूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचे निमंत्रक सदाभाऊ खोत आहेत. आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या इस्लामपूर व्यायाम मंडळाचे खेळाडू प्रो-कबड्डीत चमकले आहेत. त्या खेळाडूंचे राष्ट्रीय प्रशिक्षक पोपट पाटील यांच्या सहकार्याने खोत यांनी राज्यस्तरीय स्पर्धा भरवून भाजपची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांची छायाचित्रे स्पर्धेच्या शासकीय जाहिरातीत वापरली आहेत. मात्र त्यात या विभागाचे लोकप्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील आणि नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना डावलले आहे. मात्र आमदार पाटील यांनी खिलाडूवृत्ती दाखवत, जेथे स्पर्धा होणार आहे, त्या मैदानाची पाहणी केली. तथापी आता या मैदानावर खेळापेक्षा राजकीय डाव-प्रतिडाव पहायला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जयंतराव-सदाभाऊ एकत्र
इस्लामपूर येथील एका विवाह समारंभात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकत्रित आले होते. एवढेच नव्हे, तर लग्नसमारंभानंतर जेवायलाही ते शेजारी-शेजारी बसले होते. या त्यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.