जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: सांगलीतील कडेगावात मराठा समाजाचा भव्य मोर्चा, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 01:11 PM2023-09-05T13:11:27+5:302023-09-05T13:13:05+5:30

शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद 

Jalana lathi charge protest: Maratha community march in Kadegaon Sangli district | जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: सांगलीतील कडेगावात मराठा समाजाचा भव्य मोर्चा, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: सांगलीतील कडेगावात मराठा समाजाचा भव्य मोर्चा, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

googlenewsNext

कडेगाव : एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच , जालना घटनेचा जाहीर निषेध असो, अशा घोषणाबाजी करीत सकल मराठा समाजाच्या वतीने कडेगांव प्रांताधिकारी कार्यालावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देत शासनाने मराठा आरक्षणाचा अध्यादेश तातडीने काढावा व आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे असा आवाज उठविला.

जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. कडेगांव शहरासह तालुक्यातील मराठा बांधव आक्रमक झाले. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता सकल मराठा समाज बांधव छत्रपती शिवाजी चौकात एकत्र आले. या चौकातून मोर्चास सुरुवात झाली. 

भगवा झेंडा हातात घेवून व भगव्या टोप्या परिधान करीत मराठा बांधवांनी मोर्चास आगेकूच केली. यावेळी आंदोलकांनी जालना घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. काळ्या फिती दंडावर बांधून तीव्र निषेध नोंदवला. दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचताच आक्रमक झालेल्या अनेक मराठा बांधव व भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करीत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. तहसीलदार अजित शेलार यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.

शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद 

जालना घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरासह तालुक्यातील सर्व गावांमधून  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावोगावी ग्रामस्थांनी  व व्यापारी वर्गाने या बंदला पाठिंबा दिल्याने तालुक्यात सर्वत्र  शुकशुकाट पसरला होता.

मोठा पोलिस बंदोबस्त 

शहरातून निघालेल्या भव्य मोर्चावेळी कडेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Jalana lathi charge protest: Maratha community march in Kadegaon Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.