Sangli: कुणी घर देता का घर..?; शेकडो घरे साकारणारे चरणचे बेलदार-मिस्त्री उघड्यावर, बसस्थानकात आश्रयाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:37 IST2025-04-01T17:37:29+5:302025-04-01T17:37:43+5:30

दैनिक लोकमतमधील या वृत्ताची दखल घेऊन बेलदार मिस्त्री यांना दिलीप घोलप यांनी आपल्या घरात राहण्याची व्यवस्था केली

It was time for Sadashiv Maruti Mohite Beldar Mistry of Charan village, who built hundreds of houses, to take shelter at the bus stand | Sangli: कुणी घर देता का घर..?; शेकडो घरे साकारणारे चरणचे बेलदार-मिस्त्री उघड्यावर, बसस्थानकात आश्रयाला

Sangli: कुणी घर देता का घर..?; शेकडो घरे साकारणारे चरणचे बेलदार-मिस्त्री उघड्यावर, बसस्थानकात आश्रयाला

बालेखान डांगे

चरण : ‘कुणी घर देता का घर.. एक तुफान भिंतीवाचून.. छपरावाचून..माणसाच्या मायेवाचून.. निवाऱ्यासाठी हिंडतय..जिथून कुणी उठवणार नाही..अशी एक जागा धुंडतय..’ असे आर्जव करण्याची वेळ वेळ शंभर जणांची घरे साकारणारे चरणच्या बेलदार मिस्त्री यांच्यावर आली आहे.

दैनिक लोकमतमधील या वृत्ताची दखल घेऊन बेलदार मिस्त्री यांना दिलीप घोलप यांनी आपल्या घरात राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच समाजातील लोकांना जेवणाची व्यवस्था करण्याचे आवाहन केले.

बेलदार मिस्त्री यांच्यावर उघड्यावर चरण (ता. शिराळा) येथील बसस्थानकात आसरा घेण्याची वेळ आली आहे. चरण गावात गेली पन्नास ते साठ वर्षे वास्तव्यास असणारे सदाशिव मारुती मोहिते (बेलदार मिस्त्री) हे दगड मातीचे बांधकाम करून घरे बांधणारे कुशल कारागीर, त्यांचे सध्या वय ८५ वर्षांहून जास्त आहे. त्यांचे मूळगाव अमरापूर (सांगली) आहे. व्यवसायानिमित्त ते आपल्या कुटुंबासोबत चरण गावी आले. 

चरण, परिसरातील मोहरे नाठवडे, खुजगावपर्यंत शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली गावात शंभरहून जास्त दगड मातीची त्यांनी घरे बांधली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आकाताईसुद्धा कामावर जाऊन संसारास हातभार लावत होती. त्यांना तीन मुले व एक मुलगी आहे. आकाताई काम करत असताना पायाला खिळा लागल्याने त्यांना धनुर्वात झाल्याने त्यांचे पंचवीस वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सध्या त्यांची तीनही मुले व्यवसायानिमित्त सांगली, कडेगाव साताऱ्यात असतात.

दिवंगत बंडू हसन नायकवडी यांचे घर बेलदार मिस्त्रीनीच बांधले आहे. त्यांना त्यांची मजुरी देऊन स्वतःची एक खाेली मोफत मिस्त्रींना राहण्यासाठी दिली होती. बंडूभाई यांच्या निधनानंतरसुद्धा त्यांच्या वारसांनी हा शब्द पाळला होता. वारसांची वाटणी झाल्याने हे घर पाडून दुसरे बांधकाम होणार असल्याने मिस्त्रीच्या डोक्यावरील छत्र निघून गेले व ते उघड्यावर पडले.

उतरत्या वयात परवड

वयाच्या ८५ वर्षात दगड उचलण्याची शक्ती हातात उरली नाही, रोजगार करू शकत नाही. मुलांनी आपापले संसार थाटले. उतरत्या वयात जवळ कोणीही नाही. पोटापाण्याचा, राहण्याचा ठिकाणा नाही. अशी दयनीय अवस्था सध्या मिस्त्रींची आहे.

मदतीची गरज 

चरण बसस्थानकात ते सध्या महिन्यापासून वास्तव्यास आहेत. शेजाऱ्यांना याबाबत माहिती असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था ते करत आहेत; परंतु असे किती दिवस चालणार. लोकांसाठी परिसरात शंभरहून जास्त घरे बांधणाऱ्या बेलदार मिस्त्रींना उघड्यावर बसस्थानकात राहण्याची वेळ आली आहे. त्यांचे आधार कार्ड हरवले आहे. त्यांना आता आधार देण्याची गरज आहे शासनाने ८५ वर्षे वयाच्या बेलदार मिस्त्रींना मदत करण्याची आज गरज आहे.

Web Title: It was time for Sadashiv Maruti Mohite Beldar Mistry of Charan village, who built hundreds of houses, to take shelter at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली